नामदार साहेब! जरा संगमनेरच्या वीज कंपनीचेही कान पिळा होऽ..!! भ्रष्टाचार आणि कामचुकारीत डुंबलेल्या वीज कंपनीबाबत संगमनेरात खदखद्तोय असंतोष

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील प्रगत बाजारपेठांमध्ये समृद्धीची शेखी मिरवणार्‍या संगमनेर शहराच्या घोडदौडीला वीज वितरण कंपनीने खोडा घातला आहे. ग्राहकांंशी काही घेणंदेणं नसलेल्या आणि भ्रष्टाचाराचे कुरण ठरलेल्या या विभागाच्या गलथान कारभारामुळे संगमनेरकरांना वारंवार ‘पॉवर ऑफ’चा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले अधिकारी आणि वीज वितरण कंपनीत वाढीस लागलेला भ्रष्टाचार यामागील मुख्य कारण असून त्यातून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरला ‘वैभवशाली’ शहर बनविण्याच्या संकल्पनेलाच तडा देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नामदार साहेब! जरा संगमनेरच्या वीज कंपनीचेही कान पिळा होऽ.. असं म्हणण्याची वेळ सामान्य संगमनेरकरावर आली आहे.

आधुनिक जगात कोणत्याही परिसराच्या विकासात वीज पुरवठा अत्यंत महत्वाचा भाग आहे. जिल्ह्याचा विचार करता मुख्यालयानंतर सर्वाधीक उलाढाल, व्यापरउदीम व उद्योगधंदे असणार्‍या शहरांच्या पंक्तीत संगमनेरचे नाव अग्रणी आहे. मुळा व प्रवरा या नद्यांच्या पाण्यातून संगमनेर तालुक्यात कृषीसमृद्धी अवतरली आहे. साहजिकच त्यामुळे संगमनेरच्या बाजारपेठेलाही अनन्य महत्त्व प्राप्त झाले असून येथील बाजारपेठेतून केवळ जिल्ह्यात नव्हे तर आसपासच्या महनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात व्यापार चालतो. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी तालुक्यात सहकाराचा वेल फुलविल्याने समृद्धीचा हा प्रवाह शहरासह खेडोपाडीही पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून मात्र समृद्धीच्या या प्रवाहात वीज वितरण कंपनी खोडा घालण्याचे काम करीत असल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे. कामचुकार अधिकारी आणि त्यांच्यात फोफावलेला प्रचंड भ्रष्टाचार यातून संगमनेरची वीज वितरण कंपनी नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरत आहे.

काही वर्षांपूर्वी पुणे-नाशिक महामार्गाचे नूतनीकरण करण्यात आले होते. त्यावेळी जुन्या महामार्गावरील लाईटचे व विद्युत वाहिन्यांचे खांब हलवून ते नव्या महामार्गावर हलविण्याचे दिव्य पार पडले. मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर त्यात झालेला कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचारही समोर आला. गेल्या अनेक वर्षांपासून येथेच ठाण मांडून बसलेल्या काही अधिकार्‍यांनी आपला अनुभव पणाला लावून जूने सामान नारायणगाव येथील सरकारी गोदामात जमा करण्याऐवजी तेच सामान नवीन महामार्गावर वापरले. मात्र प्रत्यक्षात नवीन सामानांची बिलं मंजूर केली गेली व त्यातून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. या गोष्टी नंतरच्या काळात उघड झाल्यानंतर काही राजकीय संघटनांचे कार्यकर्ते, काही ‘माहिती अधिकार कार्यकर्ते’ आणि काही पत्रकारांनीही या वाहत्या गंगेत तांब्यातांब्या पाणी आपल्या अंगावर घेतले. या प्रकरणी गुन्हेही दाखल आहेत व नाशिकमधील दोघा अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई देखील झाली आहे. मात्र ते प्रकरण अद्यापही पूर्णतः बाहेर आलेले नाही.

संगमनेरच्या वीज वितरण कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठा भ्रष्टाचार ठरावा अशा या प्रकरणातून येथील काही अधिकार्‍यांची काम करण्याची आणि त्यातून मलिदा लाटण्याची पद्धत मात्र समोर आली. त्यानुसार जूने सामान वापरायचे आणि नव्याचे पैसे खाऊन मोकळे व्हायचे ही नवी पद्धत येथे रुजल्याचे वारंवार खंडीत होणार्‍या वीज पुरवठ्यातून दिसत आहे. किरकोळ वादळवारा असो वा रिमझिम पाऊस संगमनेरची बत्ती लगेच गुल होण्यामागे हेच प्रमुख कारण असल्याचे आता नागरिकांमधून उघडपणे बोलले जात आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा आठवडे बाजार भरत असतांनाही दर शनिवारी ‘देखभाली’च्या गोंडस नावाखाली शहराचा विद्युत पुरवठा आठ ते दहा तासांपर्यंत बंद ठेवला जातो.

मात्र त्यानंतर आलेल्या किरकोळ पावसाने अथवा वार्‍यानेही अनेक तास तो विस्कळीतही होतो. हे कसे काय घडते? असा भाबडा प्रश्न सामान्य संगमनेरकराला पडला आहे. किरकोळ कारणावरुन गेलेली वीज कधीकधी रात्रभर येत नसल्याने सामान्य माणूस अक्षरशः मेटाकूटीला आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून संगमनेरचा विद्युत पुरवठा रामभरोसे झाल्याने त्याचा परिणाम शहराच्या समृद्ध बाजारपेठेवरही पडत असून व्यापार्‍यांमधूनही वीज कंपनीच्या प्रती खद्खद् व्यक्त होत आहे. नागरिकांकडून वारंवार मागण्या होवूनही वीज कंपनीतील तक्रार निवारण कक्षातील दूरध्वनी आजही विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर बंदच असतो यावरुन येथील अधिकारी व कर्मचारी किती मग्रुर झाले आहेत याचेही संगमनेरकरांना दर्शन घडते.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी तालुक्यात सहकाराचे जाळे फुलवून शेतकर्‍याच्या जीवनात आनंद, समृद्धी पोहोचवण्याचे काम केले आहे. विद्यमान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरद़ृष्टीतून जून्या शहराने काम टाकून नवसाज चढवला आहे. संगमनेरात सुरु असलेल्या विविध विकासकामांमुळे व बाजारपेठेच्या वाढत्या महत्त्वामुळे शहराची घोडदौड त्यांच्या ‘वैभवशाली’ शहर या संकल्पनेच्या दिशेने सुरू असताना वीज वितरण कंपनीतील कामचुकार अधिकार्‍यांमुळे त्याला खोडा बसला असून आता ‘नामदार साहेब! जरा वीज कंपनीचेही कान पिळा होऽ.. असं म्हणण्याची वेळ सामान्य संगमनेरकरावर आली आहे.’


जिल्ह्यातील सर्वात मोठा आठवडे बाजार अशी ख्याती असलेल्या संगमनेरच्या आठवडे बाजाराच्या दिवशीच वीज कंपनी ‘देखभाली’च्या नावाखाली दिवसभर विद्युत पुरवठा खंडीत ठेवते. दर आठवड्याला हा प्रयोग राबवूनही आठवड्यातील उर्वरीत दिवस पूर्ण वीज उपलब्ध होईल याची कोणतीही शाश्वती नसते. विशेष म्हणजे चिखली फिडरवर शहरातील जवळपास 25 टक्के भाग आहे. आजही या भागाला अनेकप्रसंगी कमीदाबाने वीज पुरवठा होण्यासोबतच वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सहन करावे लागतात. त्यामुळे अनेकदा शहरातील एका भागात लखलखाट तर दुसर्‍या भागात काळाकुट्ट अंधार असे विरोधाभासी चित्रही संगमनेरकरांना नेहमीचेच आहे.

Visits: 3 Today: 2 Total: 21242

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *