बंदी शाळेचे रुपांतर संधी शाळेत व्हावे ः सावंत

बंदी शाळेचे रुपांतर संधी शाळेत व्हावे ः सावंत
जयहिंदच्या ग्लोबल कॉन्फरन्समध्ये शिक्षण परिसंवाद
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या शिक्षण क्षेत्रातील विचारांनी जगात परिवर्तन झाले. त्यामुळे हे शाश्वत विचार घेऊन भारतामध्येही मोठे परिवर्तन होणे सहज शक्य आहे. यासाठी वंचितांच्या शिक्षणासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला आणि सध्याच्या बंदी शाळेचे रुपांतर संधी शाळेत केले तर देशात आमुलाग्र बदल घडेल असा विश्वास ज्येष्ठ संशोधक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ विवेक सावंत यांनी व्यक्त केले आहे.


जयहिंद लोकचळवळीच्यावतीने आयोजित ग्लोबल कॉन्फरन्समधील शिक्षण प्रणाली या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी डीआरडीओचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अजय पोद्दार, कृतिशील शिक्षक भाऊसाहेब चासकर, अग्नेक्शा स्पायनिस्वा (पोलंड), सबरिना चौधरी (बांग्लादेश), आरिफ रेहमान (पाकिस्तान), संदीप वाकचौरे, रिशिका राका, पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी सहभाग घेतला. तर व्यासपीठावर उत्कर्षा रुपवते, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, संदीप खताळ, डॉ.सूरज गवांदे उपस्थित होते.


या परिसंवादात बोलताना सावंत म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांतून जगात मोठे परिवर्तन झाले आहे. या परिवर्तनाचे भारतात कृतिशीलतेतून अनुकरण केल्यास भारतामध्येही मोठे परिवर्तन घडेल. कारण शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. मात्र आजही ग्रामीण भागातील अनेक गरीब मुले शिक्षणापासून वंचित आहेत. या सर्वांना बंदी शाळेतून संधी शाळेत आणणे अत्यंत गरजेचे असून रोजगाराभिमुख शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना आवड असलेल्या क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी निर्माण करून देण्यासाठी शासनाने, विविध स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. याचबरोबर नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करून दिल्यास हे विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतील असा विश्वासही सावंत यांनी व्यक्त केला.


डीआरडीओचे संशोधक डॉ.पोद्दार म्हणाले की, महात्मा गांधींच्या विचारांची प्रभावी अंमलबजावणी भारतामध्ये अत्यंत तातडीने होणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारातून जगाने क्रांती केली. मग भारतही त्यांच्या विचारांतून नक्कीच शैक्षणिक क्रांती करू शकतो. आज आर्थिक विषमता संपवून शिक्षणाच्या माध्यमातून सर्व लोक एकाच व्यासपीठावर येऊ शकतात. शिक्षण हेच समाज बदलाचे प्रभावी माध्यम आहे म्हणून त्यावर मूल्याधारित शिक्षण व रोजगाराभिमुख शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. संधी खूप आहेत त्याचा उपयोग ग्रामीण भागापर्यंत करून दिला गेला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन कृतीशील शिक्षक संदीप वाकचौरे व उत्कर्षा रुपवते यांनी केले तर संदीप खताळ यांनी आभार मानले.

Visits: 115 Today: 3 Total: 1106276

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *