विरोधक तालुक्याच्या विकासाच्या आड येताहेत ः पिचड अकोले बाजार समिती निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्याची कामधेनू असलेल्या अगस्ति साखर कारखान्यात राजकारण आणून कारखान्याची निवडणूक लादली. त्यानंतर अमृतसागर, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही आडमुठेपणाने वागून काम करणारे विरोधक तालुक्याच्या विकासाच्या आड येत आहेत. मी आदिवासी, शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. पाणी अडविण्याचा कार्यक्रम हाती घेतला. मात्र ज्यांना पुढारी केले तेच म्हणतात काय केले? त्यामुळे मला आडूमाडूच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, असा हल्लाबोल माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केला.
अकोले तालुक्यातील कोतूळ येथे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार वैभव पिचड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख, सयाजी देशमुख, जिल्हा बँकेचे माजी तालुका विकास अधिकारी बाबुराव देशमुख, अजीज सय्यद, भरत देशमाने, किरण देशमुख, भागतील सर्व सरपंच, सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित हते. प्रास्ताविक व सूत्रसंचलन माजी सरपंच राजेंद्र देशमुख यांनी केले.
पुढे बोलताना माजी मंत्री पिचड म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची जागतिक पातळीवर उंची वाढवली. त्यांच्या माध्यमातून जल जीवन मिशन माध्यमातून तालुक्यात 93 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची योजना सुरू झाली आहे. कोरोना काळात गरीब, आदिवासी, शेतमजूर यांना मोफत धान्य देण्याची योजना, शेतकर्यांच्या खात्यावर अनुदान, अशा विविध योजना सुरू असून तालुक्यातील लुंगेसुंगे मोदींवर टीका करतात. तुमचे वय काय तुम्ही बोलता काय? ज्यांनी चाळीस वर्षे विविध संस्थांच्या माध्यमातून गैरफायदा घेऊन आपले प्रपंच चालविले त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तालुक्यातील संस्था उभारण्याचे काम कुणी केले हे जनतेला माहीत आहे. मला अंधळ्यांच्या गावात आरसे विकायचे नाही. अडीच वर्षात काय दिवे लावले साधा वसंत बंधारा तरी बांधला का? असा सवाल त्यांनी आमदार डॉ. किरण लहामटे यांचे नाव न घेता विचारला.
माजी आमदार वैभव पिचड म्हणाले, तालुक्यात केवळ पिचड कुटुंबियांना शिव्या शाप देण्याचे काम सुरू आहे. शेतकरी ऊसवाढीचा नाही तर दूधवाढीचा कार्यक्रम घेत आहेत. कारण त्यांना आमच्यावर विश्वास आहे. केंद्र, राज्य सरकारवर टीका करणारे निधीसाठी पाय धरत आहे. केवळ निधी व त्यातून आपली पिलावळ पोसणे हाच विरोधकांचा धंदा असल्याचे ते म्हणाले. बाबुराव देशमुख यांनी अगस्ति, पिंपळगाव खांड, अंबित, मुळा बांधणीचे श्रेय पिचड यांनाच असल्याचे सांगितले. शेवटी अशोक उगले यांनी आभार मानले.