धारणगाव रस्त्याची नगरपालिकेने त्वरीत डागडुजी करावी ः अॅड.पोळ
धारणगाव रस्त्याची नगरपालिकेने त्वरीत डागडुजी करावी ः अॅड.पोळ
लोकप्रतिनिधींचे या रस्त्यानजीक कार्यालय असूनही अक्षम्य दुर्लक्ष
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ.बाबसाहेब आंबेडकर स्मारक दरम्यान धारणगाव रस्त्यावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. या रस्त्याची नगरपालिकेने त्वरीत डागडुजी करावी, अशी मागणी लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अॅड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

याविषयी पत्रकात अॅड.पोळ पुढे म्हणाले, गेल्या पाच-सहा महिन्यांपासून सदर रस्त्यावर कोरोना साथीच्या आजाराने वाहतूक कमी होती. त्यातच यावर्षी पोलीस व महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असलेली बेकायदेशीर वाळू वाहतुकीचे डंपर जात नव्हते. मात्र नुकत्याच काही दिवसांपासून झालेल्या पावसाने या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. शहराच्या पश्चिम बाजूला जाणार्या नागरिकांची तसेच ग्रामीण भागातून येणार्या-जाणार्या नागरिकांची या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी गर्दी असते. त्या अनेक रुग्णालयांत ये-जा करण्यासाठी रुग्णांचीही मोठी गर्दी असते. मात्र मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालवणे मुशिकल झाले आहे. यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढले आहे.

मागील नगरपालिका निवडणुकीत स्वच्छ पाणी व सुंदर रस्ते देण्याचे आश्वासन देणारे लोकप्रिय, लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्या दुकानासमोरून तर शहराचे रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपये मंजूर करून आणणारे तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांचे कार्यालयही याच रस्त्यावर आहे. मात्र अद्याप तरी त्यांचे लक्ष या रस्त्यावरील खड्ड्यांकडे गेले नाही हे कोपरगावच्या जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल. यापूर्वी देखील नगराध्यक्षांना मागील वर्षी या रस्त्याबाबत विचारणा करून रस्ते दुरुस्तीमध्ये हलगर्जीपणा करणार्या ठेकेदारांच्यावर कारवाईची मागणी केली होती. आणि या रस्त्याच्या ठेकेदारावर कारवाई का नाही? असे विचारले होते.

परंतु मागील सहमती एक्सप्रेसच्या काळात सदरचा रस्ता झाल्याचे सांगण्यात आले होते. काही का असेना निवडणुकीपूर्वी अनेक विकासकामांचे उद्घाटने होत असतात. तसेच कदाचित या रस्त्यांचे उद्घाटन होईलही. मात्र नगरपालिकेच्या निवडणुका अजून तरी लांब आहेत. त्यावेळी पुन्हा गावातील रस्ते स्वच्छ सुंदर व दर्जेदार करण्याचे विकासकामांचे पुस्तक छापून येईल. तूर्तास तरी सदर रस्त्यावर डागडुजी करावी अशी माफक अपेक्षा माजी नगरसेवक सोमनाथ म्हस्के, लोकस्वराज्य आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष किरण अढांगळे, शहराध्यक्ष सुजल चंदनशिव, राजू रोकडे, बाळासाहेब पवार, भारत रोकडे आदिंनी व्यक्त केली आहे.

