उक्कलगाव येथे बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न फसला ग्रामस्थांकडून चोरट्यांचा बेलापूरपर्यंत पाठलाग; मात्र चोरटे पसार होण्यात यशस्वी


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील उक्कलगाव येथील शेतकरी रामदास चंद्रभान थोरात यांच्या कोल्हार-बेलापूर रस्त्यावरील निवासस्थानी मंगळवारी (ता.25) भरदुपारी बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न फसल्याची घटना घडली आहे. या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सध्या कांदा निवडीची लगबग सुरू आहे. त्यावेळी घरातील सगळेच सदस्य हे शेतात काम करत होते. यावेळी घरी एकटी मुलगी होती. तिचेही काम उरकून घराला कुलूप लावून शेताकडे गेली. काही वेळानंतर लोखंडी दरवाजाचा आवाज ऐकू आल्याने अक्षय हा घराकडे आला. तेथे एक पांढरे कापडे घातलेला अज्ञात इसम झाडाखाली उभा होता. त्याच्या बरोबर असलेला दुसरा एक अज्ञात इसम घरामध्ये उचकापाचक करत असल्याचे अक्षयने पाहिल्यानंतर लगेच त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. अक्षयला बंदुकीचा धाक दाखविल्याने तो आरडाओरडा करत घराकडे पळाला. काहीतरी आवाज आल्याने शेताकडचे अनेक लोक येथे जमले. तोपर्यंत चोरटे विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून बेलापूरच्या दिशेने पसार झाले. कोणतेही विलंब न करता ग्रामस्थांनी चोरट्यांचा बेलापूरपर्यंत पाठलाग केला. पण चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले.

चोरटे सुसाट वेगाने कोणत्या बाजूने गेल्याचे हे मात्र समजले नाही. यावेळी ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून तातडीने गावकर्‍यांना संदेश दिल्याने गावकरी घटनास्थळी दाखल झाले. परंतु, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. याबाबत घटनेची माहिती बेलापूर पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होवून वरिष्ठांना माहिती कळविली होती. पोलिसांनी कोल्हार-बेलापूर-उक्कलगाव येथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात दुचाकीवरील चोरट्यांनी तोंडाला बांधलेले असल्याने स्पष्ट दिसत नव्हते. या घटनेने उक्कलगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Visits: 4 Today: 1 Total: 29272

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *