जलयुक्त शिवार अभियान-2 अंतर्गत 240 गावांची निवड 20 मे पर्यंत गाव आराखडे तयार करण्याच्या प्रशासनाला सूचना


नायक वृत्तसेवा, नगर
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2014 ते 2019 दरम्यान जलयुक्त शिवार अभियान-1 योजना राबविण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या योजनेवर आक्षेप घेत ती बंद करण्यात आली. दरम्यान शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येताच त्यांनी राज्यात पुन्हा जलयुक्त शिवार अभियान-2 सुरू केले आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील 240 गावांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या गावात मंगळवारपासून (ता.25) शिवार फेरी सुरू होईल तर 20 मे पर्यंत गाव आराखडे तयार केले जाणार आहेत.

जलयुक्त शिवार अभियान-1 योजनेत जिल्ह्यातील 1016 गावांतून 32 हजार कामे करण्यात आली. जलयुक्त-2 मध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तालुका पातळीवरील प्रांताधिकारी समितीने शिफारस केलेल्यांपैकी 240 गावांची निवड केली आहे. जास्त उपसा झालेली, टँकरग्रस्त, अटल भूजल प्रकल्प कृषी सिंचन योजनेतील गावांच्या निवडीस प्राधान्य देण्यात आले आहे. यापूर्वी जलयुक्त-1 मध्ये निवड झालेली, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात, आदर्श गाव योजनेत सहभागी गावं जलयुक्त-2 मधून वगळण्यात आली आहेत.

पूर्वीच्या योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारणाची कामे केली जात होते. जलयुक्त-2 मध्ये आता माथा ते पायथा या पद्धतीने पाणलोटनिहाय कामे केली जाणार आहेत. आराखड्यातील कामे ज्या-त्या विभागामार्फत निधी उपलब्ध करून तसेच ज्या विभागामार्फत कामांसाठी निधी उपलब्ध होणार नाही त्यासाठी राज्य सरकारमार्फत स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. जलयुक्त-2 मधील कामे करताना अपूर्ण व प्रगतीपथावरील प्राधान्यक्रम ठरवून दिला आहे. त्यानुसार अपूर्ण व प्रगतीतील कामे प्राधान्याने, त्यानंतर क्षमता पुनर्स्थापित करणे (दुरूस्ती व नूतनीकरण), क्षेत्र उपचार कामे, नाला उपचार कामे, लोकसहभाग किंवा सार्वजनिक खासगी भागीदारीतील कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी आदर्शगाव योजनेचे राज्य कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत कार्यशाळा घेण्यात आली.


तालुकानिहाय संख्या..
नगर 14, नेवासा 12, श्रीगोंदा 14, पारनेर 17, कर्जत 20, जामखेड 22, शेवगाव 10, पाथर्डी 15, श्रीरामपूर 12, राहुरी 19, कोपरगाव 23, राहाता 21, संगमनेर 21 व अकोले 20.

Visits: 7 Today: 1 Total: 79635

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *