कोपरगावच्या तरुणीवर मदरशात अत्याचार करुन केले धर्मांतर मौलवीसह पाच जणांवर गुन्हा दाखल; दोघांना घेतले ताब्यात


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरातील मध्यावर्ती भाग असलेल्या इंदिरापथ येथील वीसवर्षीय युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर खडकी जवळील मदरशात नेऊन चौघांनी तिच्या मर्जीविरोधात शरीरसंबंध करुन त्याचे छायाचित्र व चित्रफीत तयार केली. त्यानंतर ब्लॅकमेल करत इंदोर येथे बोलावून पुन्हा अतिप्रसंग व बळजबरीने धर्मांतर करुन नमाज पठण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात इंदोरच्या मौलवीसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून देशात लव्ह जिहाद, हनी ट्रॅप, लँड जिहाद, गेम जिहाद अशा अनेक प्रकारच्या जिहादाची प्रकरणे समोर आली आहेत. अशातच श्रद्धा वालकर आणि दिल्लीमधील साक्षी मर्डर प्रकरणांमुळे या मुद्यावर पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. वारंवार असे प्रकार समोर येत असूनही हिंदू मुली मुस्लिमांच्या जाळ्यात अडकत आहेत. आजूबाजूला सारे काही स्पष्ट दिसत असतानाही डोळे झाकून या मुली मुस्लिमांवर विश्वास ठेवतात. लव्ह जिहाद रोखण्यात खरेतर हेच एक मोठे आव्हान असताना कोपरगाव शहरात देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे.

शहरातील एका वीसवर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन सायम कुरेशी (रा. जुना पिठा इंदोर, मध्यप्रदेश), इमरान अयुब शेख (रा. कोपरगाव), छोटू उर्फ कलीम (पूर्ण नाव माहीत नाही), फैय्याज (पूर्ण नाव माहीत नाही दोघे रा. कोपरगाव) व इंदोर येथील मौलवी पूर्ण नाव माहिती नाही अशा पाच जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आरोपी सायम कुरेशी याने तीन वर्षांपूर्वी मोबाईलवरुन पीडित युवतीशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर एक वर्षाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून 21 मे 2023 रोजी सकाळी 6 ते 12 वाजेच्या सुमारास कुरेशीने युवती व तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी त्यास विरोध केला असता वरील चौघांनी संगनमताने युवतीचे हातपाय धरुन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तिला बळजबरीने तिच्याच मोटारसायकलवरुन खडकी जवळील मदरशात घेवून आले आणि बळजबरीने शरीरसंबंध केले. त्याचे छायाचित्र व चित्रफीत तयार करुन हे समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देवून इंदोर येथे बोलावून घेतले.

तेथे देखील एका घरात कुरेशी याने युवतीशी बळजबरीने शरीरसंबंध केला व इंदोर येथील एका मौलवीकडून बळजबरीने नमाज पठण करण्यास लावले. तसेच धर्मांतरासाठी व कुरेशीबरोबर लग्न करण्यासाठी दबाव आणला. त्यानंतरही आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. यावरुन कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 376, 363, 354, 328, 295, 504, 506, 34 प्रमाणे वरील पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. सदर गुन्ह्यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे दोन पथके रवाना झाली असल्याची माहिती तपासी अधिकारी उपनिरीक्षक भरत दाते यांनी दिली.

Visits: 11 Today: 2 Total: 79617

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *