राहीबाई पोपेरे यांची राष्ट्रीय समितीवर निवड
नायक वृत्तसेवा, अकोले
बीजमाता, पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची नुकतीच राष्ट्रीय समितीवर निवड झाली आहे. याबाबत प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज् फार्मर्स राईट अॅक्टचे प्रबंधक डॉ. टी.के.नागरत्ना यांनी या निवडीचे पत्र पोपेरे यांना पाठवलेले आहे.
या समितीमार्फत देशपातळीवर पारंपरिक बियाणे संवर्धन, निर्मिती, संगोपन व प्रचार-प्रसार करणार्या व्यक्ती, संस्था, मंडळ व संस्था यांची निवड राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांसाठी करण्यात येते. देशातील उत्कृष्ट बीज संवर्धक निवडण्याची जबाबदारी या समितीवर असते. देशपातळीवर दरवर्षी सुमारे 85 लाख रुपये किंमतीचे पुरस्कार या समितीच्या माध्यमाने निवडण्यात आलेले शेतकरी, संस्था व व्यक्तींना दिले जातात. या समितीवर बीजमाता राहीबाई पोपेरे यांची निवड होणे म्हणजे तळागाळात काम करणार्या गरीब हातांना मिळालेला न्याय म्हणता येईल, अशी भावना सामाजिक स्तरातून व्यक्त होत आहे. त्यांच्या या निवडीबद्दल बायफ संस्थेचे अध्यक्ष गिरीश सोहोनी, रिजनल डायरेक्टर व्ही.बी.द्यासा, राज्य समन्वयक सुधीर वागळे, अतिरिक्त राज्य समन्वयक प्रदीप खोसे, विषय तज्ज्ञ संजय पाटील, डॉ.विठ्ठल कौठाळे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.