बिबट्याचा हल्ला नव्हे तर हत्याराने वार करून इसमाचा खून! वडदरा येथील घटना; शवविच्छेदन अहवालातून झाले उघड

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोटा गावांतर्गत असलेल्या वडदरा येथे बिबट्याच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.22) घडली होती. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. यावरून घारगाव पोलिसांनी तिसर्या दिवशी सोमवारी (ता.24) एप्रिल रोजी अज्ञात इसमाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आता पठारभागासह तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बोटा गावांतर्गत असलेल्या वडदरा (केळेवाडी) येथील उत्तम बाळाजी कुर्हाडे (वय 63) शनिवारी पावणे आठ ते आठ वाजेच्या सुमारास ते आणि त्यांची आई कासाबाई हे दोघे घरात होते. त्याचवेळी बिबट्याने थेट घरात घुसून कुर्हाडे यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे ते जागीच ठार झाले. त्यानंतर बिबट्याने धूम ठोकली. कासाबाई यांनी घराच्या बाहेर येवून जोरजोराने आरडाओरडा केल्याने आजूबाजूला असलेल्या नातेवाईकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर काहींनी घटनेची माहिती घारगाव पोलीस व वन विभागाला दिली, त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी उत्तम कुर्हाडे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात पाठविला. रविवारी (ता.23) सकाळी कुर्हाडे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, कुर्हाडे यांच्यावर अज्ञात इसमाने धारदार हत्याराने छातीवर, पाठीवर व हातावर वार करून त्यांचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले. त्यामुळे याप्रकरणी घारगावचे पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध गुरनं. 203/2023 भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर हे करत आहे. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षिका स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

मयत उत्तम कुर्हाडे यांचा परिसरात कोणाशी वाद होता का? याचा तपासही पोलीस करत आहे. त्यांचा खून नेमका कोणी केला आणि कशासाठी केला याचा घारगाव पोलीस शोध घेत आहे. सुरूवातीला बिबट्याच्या हल्ल्यातच कुर्हाडे यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र खरे कारण शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आहे. त्यामुळे प्रकरणाचे गुढ वाढले आहे.
