संगमनेरच्या देवभूमीकडे जाणारा पूल बांधा ः जाजू नागरिकांचे उत्स्फूर्त आंदोलन; अबालवृद्धांची भर उन्हात गर्दी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या प्रवरा परिसरात मोठी लोकवस्ती असून शाळा, महाविद्यालयासह या परिसरातील विविध मंदिरांमध्ये दररोज दर्शनासाठी येणार्‍यांची मोठी संख्या आहे. त्यामुळे या परिसराला संगमनेरची देवभूमी म्हणूनही वेगळी ओळख आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपूर्वी या भागात जाणारा एकमेव पूल खचल्याने नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासन आणि प्रशासनाने या गोष्टींचा गांभिर्याने विचार करुन नागरिकांना किमान दुचाकी घेवून या पुलावरुन जाता येईल इतका सुरक्षित रस्ता तयार करुन द्यावा व लवकरात लवकर मुख्य पुलाचे कामही मार्गी लावावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व माजी उपनगराध्यक्ष नीलेश जाजू यांनी केली.

गेल्या वर्षी 13 ऑक्टोबर रोजी स्वामी समर्थ मंदिराजवळून प्रवरानदीकडे जाणारा पूल खचला होता. तेव्हापासून पालिकेने हा मार्ग अडथळे निर्माण करुन बंद केला आहे, तर प्रवरा परिसरात राहणार्‍या नागरिकांसाठी चव्हाणपुर्‍याकडून येणार्‍या रस्त्याला संलग्न करुन तात्पुरत्या स्वरुपाचा कच्चा पूल तयार करण्यात आला आहे. मात्र या पुलावरुन लांबचा हेलपाटा पडत असल्याने आजही अनेक नागरिक, लहान मुले व विद्यार्थी खचलेल्या पुलाचा वापर करीत असल्याने त्यातून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. मात्र पालिकेत सध्या प्रशासकांचे राज्य असल्याने गेल्या सहा महिन्यांत याबाबत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले असून त्यांनी आज सकाळी एकत्र येवून पुलासमोरच ठिय्या दिला होता, यावेळी बोलताना नीलेश जाजू यांनी वरील मागणी केली.

या आंदोलनाच्या निमित्ताने वस्तुस्थिती सांगताना शहर भाजपाचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले यांनी भूमिगत गटाराचे काम सुरु असताना आर. एम. कातोरे या ठेकेदाराने पालिकेच्या बांधकाम विभागाचे अभियंता सुतावणे यांच्याशी संगनमत करुन मंजूर नकाशा डावलून गटाराचे पाईप पुलाखालून घातले. त्यासाठी ठेकेदाराने पुलाच्या मधोमध असलेला भराव काढला तर एका माजी पदाधिकार्‍याने ब्रेकर लावून पुलाच्या पायालाच खाच पाडल्याने सदरील पूल खचल्याच्या गंभीर आरोपाचा यावेळी पुनरुच्चार केला. सदरील प्रकार हा मानवनिर्मित असल्याने गटाराचे काम करणारा ठेकेदार, पालिकेचे बांधकाम अभियंता व ‘त्या’ पदाधिकार्‍यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

साईनगर, पंपींग स्टेशनसह या पुलावरुन रोजीरोटीसाठी जवळपास पंधरा हजारांहून अधिक जण ये-जा करतात तर जवळपास चार हजार विद्यार्थ्यीही या पुलाचा दररोज वापर करतात. असे असतानाही गेल्या सहा महिन्यांपासून या पुलाच्या नूतनीकरणाचे काम होत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त करताना गणपुले यांनी पावसाळ्यापूर्वी सदरील पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी माजी नगरसेवक शिरीष मुळे, ज्ञानेश्वर करपे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख कैलास वाकचौरे, पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी, माजी नगरसेविका सुषमा तवरेज, सीताराम मोहरीकर, अ‍ॅड. संग्राम जोंधळे यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना रहिवाशांच्या अडचणींचा पाढा वाचला. या आंदोलनात प्रवरा परिसरातील नागरिकांसह काही विद्यार्थी व लहान मुलेही सहभागी झाली होती. यावेळी अविनाश थोरात अल्पणा तांबे, भैय्या तांबोळी, अमोल खताळ, कैलास लोणारी, संजय शिंदे, भगवान घोडेकर, लखन घोरपडे, ज्योती भिंगारे, दगाबाई धात्रक, रंजना अरगडे, वैशाली घोडेकर, अर्चना राऊत, शशिकला भांगरे, मंगल गुंजाळ, मुकेश परदेशी, बाळू अप्रे, अंकुश तांबे, संतोष भंडारी आदी उपस्थित होते.


म्हाळुंगी नदीवरील पूल खचल्याने गेल्या सहा महिन्यांपासून येथील रहिवाशांसह विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय याची प्रशासनाला जाणीव आहे. या अडचणी काहीअंशी कमी व्हाव्यात यासाठी पालिकेने तातडीने कच्चा पुलही उभारला आहे. मोठ्या पुलाची दुरुस्ती शक्य नसल्याने तो नव्याने बांधावा लागणार आहे. त्यासाठी यापूर्वीच पालिकेने शासनासह संलग्न असलेल्या विभागांना प्रस्तावही पाठवले असून त्याचा सातत्याने पाठपुरावाही सुरु आहे. या पुलासाठी आवश्यक असलेला निधी प्राप्त होताच तत्काळ या पुलाचे काम सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, लोकांना सहन कराव्या लागणार्‍या अडचणीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
– राहुल वाघ
मुख्याधिकारी – संगमनेर नगरपरिषद

Visits: 117 Today: 1 Total: 1112976

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *