डोक्यावर पेटते कठे घेऊन भाविकांचा बिरोबाला नवस कौठवाडी येथे यात्रेनिमित्त जपली जातेय अनोखी परंपरा


नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील राजूरपासून जवळच असलेल्या कौठवाडी गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून परंपरागत भरणारी कठ्याची यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. डोक्यावर मडके (कठे) घेतलेले भाविक, मडक्याला छिद्रे पाडून, मडक्यात उकळलेले तेल टाकून नवस फेडणारे व बोलणारे भाविक, हे दृश्य रात्रीच्या अंधारात उठून दिसत होते. रात्रभर उत्साहात व पेटत्या कठ्यांच्या उजेडात परिसर उजळून काढणारी ही यात्रा पाहण्यासाठी, तसेच देवाला नवस बोलण्यासाठी राज्यभरातून लोकांनी येथे गर्दी केली होती.

कौठवाडी गावात श्री बिरोबा देवाचे मंदिर आहे. कठ्याच्या यात्रेमुळे हे गाव सर्वदूर प्रसिद्ध झाले आहे. अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, धुळे, कल्याण, विदर्भातून लोकांनी येथे यात्रेसाठी दरवर्षी गर्दी करतात. यंदा देखील अभूतपूर्व गर्दी झाली होती. कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी देवाला ‘कठा’ लावून नवस बोलला जातो. हा नवस पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. कठा म्हणजे मडक्याची घागर. मडक्याची वरची बाजू कापून त्यात खैर, साग, चंदन अशी विविध प्रकारची लाकडे व समिधा टाकून घागर पूर्ण भरतात. त्यात गोडेतेल टाकून चांगली भिजवतात. घागरीच्या चोहोबाजूंनी पांढरे शुभ्र कापड गुंडाळून, वरच्या टोकाला मंदिरासारखा आकार करतात. हे कठे बिरोबा मंदिरात ठेवतात. साकिरवाडी येथून सात वाजता मानाची काठी येते व बिरोबा की जय अशा घोषात ढोलताशांच्या गजरात कठे पेटविले जाऊन यात्रेला सुरूवात होते.

मंदिराभोवती उघड्या अंगाने, डोक्यावरून संपूर्ण शरीरावर वाहत असलेले तेल, डोक्यावरचा अग्नी अशा वातावरणात हे दृश्य पाहणार्‍यांच्या अंगाला अक्षरशः काटा येतो. यंदा 74 कठे पेटविले होते. भाविकांची संख्याही वाढत असल्याची माहिती दत्ता भोईर यांनी दिली. सुरेश भांगरे, सरपंच विठ्ठल भांगरे, बाळू घोडे, सावळेराम भांगरे यांच्यासह यात्रा समिती व ग्रामस्थांनी नियोजन केले होते. मनोरंजनासाठी तमाशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तर राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *