पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कारला अपघात! तीन जखमी, कारचा चक्काचूर; काहीकाळ वाहतूकही ठप्प

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी शिवारातील कुर्‍हाडे वस्ती येथे कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये तिघे जखमी झाले असून ही अपघाताची घटना बुधवारी (ता.18) पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

या अपघाताबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अभिजीत शंकर लुगडे (वय 27, रा. कासारवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), प्रसाद पद्माकर कलाल (वय 32 रा. नवी मुंबई) व एक महिला नाव समजू शकले नाही असे तिघे कारमधून (क्र. एमएच. 12, यूसी. 2174) नाशिकला कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून पुन्हा ते संगमनेर मार्गे पुणेच्या दिशेने जात होते. बुधवारी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा शिवारातील माळवाडी कुर्‍हाडे वस्ती येथे आले असता त्याचवेळी कारला भीषण अपघात झाला. त्यामुळे कार थेट महामार्गावर आडवी झाली होती.

त्यानंतर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती म्हणून काही वाहनचालकांसह नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना कारमधून बाहेर काढत रुग्णवाहिकेतून आळेफाटा (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील खासगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले. हा अपघात झाल्याचे समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यकक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख, अरविंद गिरी, उमेश गव्हाणे, नंदकुमार बर्डे, पोलीस पाटील संजय जठार यांनीही घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर छोट्या-मोठ्या वाहनांच्या अपघातात वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेच्या आहेत.

Visits: 113 Today: 4 Total: 1108020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *