अवघ्या चौदा वर्षाच्या मुलीसोबत तरुणाचे प्रेमचाळे! चक्क वडिलांच्या मोबाईलवरच सुरू होते चॅटींग; पालक मात्र अनभिज्ञ..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जगात मोबाईलने क्रांती केल्याचे चित्र पदोपदी दिसत असताना त्याच मोबाईलच्या गैरवापरातून घडणार्‍या आर्थिक फसवणुकीच्या घटनाही दररोज समोर येत आहेत. आता अशा प्रकारांमध्ये वयात नसलेल्या लहान मुलींना प्रेमजाळात भरकटवण्याचे धक्कादायक प्रकारही समोर येवू लागले आहेत. रविवारी संगमनेरातून असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत एका अठरा वर्षाच्या तरुणाने अवघ्या चौदा वर्ष वयाच्या मुलीला प्रेमपाशात अडकवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी बोलावले. विशेष म्हणजे सदरील मुलगी आपल्या वडिलांचा मोबाईल वापरत असताना तिची ‘इन्स्टाग्राम’वर या तरुणाशी ओळख झाली आणि त्यावरुनच त्यांचे प्रकरण रंगात आले. मात्र ही गोष्ट काही जागृत नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी ‘त्या’ तरुणाची यथेच्छ धुलाई करीत त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शहरातील मोमीनपुर्‍यात राहणार्‍या अमन सलीम मोमीन या तरुणाविरोधात अपहरणासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्यातील (पोक्सो) तरतुदींन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना पालकांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी असून आपल्या पाल्यावरील अंधविश्वास अशा प्रकारांना कसा पूरक ठरु शकतो हे स्पष्ट करणारी आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरचा धक्कादायक प्रकार रविवारी (ता.23) दुपारी चारच्या सुमारास गंगामाई घाटाच्या परिसरात घडला. वयाने अतिशय लहान दिसणारी मुलगी तिच्यापेक्षा वयाने आणि शरीराने मोठ्या दिसणार्‍या तरुणासोबत नदीकाठावरील आडोशाला बसलेले पाहून त्या भागात वावर असणार्‍या काहींना संशय आला. त्यातील काहींनी याबाबत विचारणा केली असता सदरील मुलगी वयाने खूप लहान असल्याचे समोर आले तर तिच्यासोबत असलेला मुलगा वयात असलेला पाहून तेथे उपस्थित असलेल्या अनेकांचा राग अनावर झाला. त्यामुळे त्यातील काहींनी लहान मुलींना चुकीच्या मार्गावर नेवू पाहणार्‍या त्या तरुणाची तेथेच येथेच्छ धुलाई केली व त्या दोघांनाही शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

सदरील प्रकरण पोलीस दप्तरी पोहोचल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या आई-वडिलांना शहर पोलीस ठाण्यात पाचारण केले. यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदरील मुलगी घरात असताना आपल्या वडिलांचा मोबाईल वापरत असतं. त्यातूनच इन्स्टाग्राम या सोशल अ‍ॅप्लिकेशनवरुन तिची ओळख शहरातील मोमीनपुरा परिसरात राहणार्‍या अमन सलीम मोमीन या अठरावर्षीय तरुणाशी झाली. सुरुवातीचे काही दिवस त्या तरुणाने तिच्याशी गोडगोड बोलून तिला आपल्या प्रेमपाशात अडकविले. त्यातून ती फसल्याची खात्री पटताच रविवारी (ता.23) दुपारी त्याने इन्स्टाग्रामवरुन तिच्याशी संपर्क साधला आणि तिला भेटण्यासाठी संगमनेर बसस्थानकावर बोलावले.

काही दिवसांच्या सोशल माध्यमातील ओळखीतून आपल्या आई-वडिलांचा विश्वास पायदळी तुडवत सदरील अल्पवयीन मुलगी कोणताही विचार न करता तडक बसस्थानकावर पोहोचली. तेथे आधीच नियोजनबद्ध पद्धतीने दुचाकी घेवून तिची वाट पाहणार्‍या आरोपी अमन सलीम मोमीन याने तिला पाहताच आपल्या दुचाकीवर बसण्याचा इशारा केला आणि काही क्षणात सुसाट वेगाने तिला घेवून थेट गंगामाई परिसरात पोहोचला. दुपारची वेळ असल्याने नदीच्या परिसरात जेमतेम लोकांची उपस्थिती वगळता शुकशुकाट होता, त्याचा फायदा घेत सज्ञान असलेल्या त्या तरुणाने अज्ञान असलेल्या त्या मुलीला घाटाच्या आडोशाला नेवून तिला आपल्या प्रेमपाशात पूरते फसवण्याची योजना कार्यान्वीत केली.

मात्र सदरचा प्रकार त्यावेळी या परिसरात असलेल्या काहींच्या निदर्शनास आल्यानंतर त्याबाबत कुजबूज सुरू झाली आणि त्यातील काहींनी थेट ‘त्या’ आडोशाच्या ठिकाणी जावून त्यांची चौकशी केली असता मुलाच्या तुलनेत मुलगी खुपच लहान असल्याचे समोर आले. हा प्रकार पाहून तेथे उपस्थित असलेल्यांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी आरोपी अमन मोमीन याची येथेच्छ धुलाई केली व नंतर दोघांनाही शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी पीडित मुलीच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात पाचारण करुन घडला प्रकार सांगितला. त्यानंतर रात्री उशिराने पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यावरुन पोलिसांनी अमन सलीम मोमीन (वय 18, रा.मोमीनपुरा) याच्याविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 363 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे (पोक्सो) कलम 11, 12 नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

कोविड संक्रमणाच्या कालावधीत लोकांना एकत्र येण्यास निर्बंध असल्याने त्यातून जगभरात ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा अविष्कार झाला. त्यातून अगदी प्राथमिक वर्गात असलेल्या विद्यार्थ्यापासून सर्वांच्याच हाती मोबाईल आले. या सर्व प्रक्रियेतून समाजातील मोबाईल साक्षरताही मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचे चांगले-वाईट परिणाम सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे आपला पाल्य मोबाईलचा वापर कसा करतोय याचे नियंत्रण ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी पालकांवरच असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाल्यास काय घडू शकते याचे मूर्तीमंत उदाहरण रविवारी गंगामाई घाटाच्या परिसरातून समोर आले असून ही घटना पालकांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी आहे.


काही पालकांनी सावधानता म्हणून आपल्या मुलांना स्वतंत्र मोबाईल घेवून न देता आपल्याच मोबाईलचा वापर करण्याची सवलत दिली. रविवारी संगमनेरात घडलेल्या या प्रकरणातील अवघ्या चौदा वर्षाची मुलगीही आपल्या वडिलांचाच मोबाईल वापरत होती. त्याच मोबाईलवर तिने पालकांची नजर चुकवून इन्स्टाग्रामही कार्यान्वित केले होते व त्यावरुनच तिची सदरील आरोपीशी ओळख झाली. इतका सगळा प्रकार घडूनही ‘त्या’ मुलीच्या पालकांना त्याबाबत काहीच समजले नाही, त्यावरुन आजची पिढी मोबाईलच्या बाबतीत पालकांपेक्षा कितीतरी पुढे असल्याचेही सिद्ध झाले असून शिक्षण सोडून अनेक विद्यार्थी अशाप्रकारांमध्ये भरकटत असल्याचेही दिसून आले आहे. ही घटना गांभिर्याने घेवून प्रत्येक पालकाने आपल्या मुलांवरील अंधविश्वासाचा चष्मा काढून त्याकडे बघण्याची गरजही यानिमित्ताने प्रकर्षाने समोर आली आहे.

Visits: 232 Today: 8 Total: 1114720

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *