लाँग मार्चमध्ये नेवासा तालुक्यातील मजूर सहभागी होणार ः डॉ. घुले डॉ. अजित नवलेंच्या नेतृत्वाखाली अकोले ते लोणी मोर्चाचे आयोजन

नायक वृत्तसेवा, नेवासा
लाँग मार्चसाठी नेवासा तालुक्यातून हजारो बांधकाम मजूर धडकणार असल्याची माहिती समर्पण मजदूर संघाचे मार्गदर्शक व कामगार नेते डॉ. करणसिंह घुले यांनी सोनई येथील बैठकीत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. करणसिंह घुले म्हणाले की, कामगार व शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली 26 एप्रिलपासून अकोले ते लोणी हा 60 किलोमीटर अंतराचा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. शेतकरी आणि बांधकाम मजुरांच्या विविध मागण्यांसाठी हा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. मजुरांसाठी असलेल्या घरकुल योजनेचे अनुदान हे पाच लाख रुपये असावे, नोंदीत बांधकाम मजुरास घरकुलाचे अनुदान त्वरित मिळावे, नोंदीत बांधकाम मजुरांसाठी 3 लाखांचा समूह आरोग्य विमा तसेच 5 लाखांचा अपघात विमा मिळावा, शिष्यवृत्तीचे पैसे नोंदीत बांधकाम मजुरांच्या खात्यात दरवर्षी थेट जमा व्हावेत, मयताचे लाभ व इतर लाभ हे एक महिन्याच्या आत नोंदीत कामगाराच्या खात्यात जमा व्हावे, नोंदणी व नूतनीकरणाच्या प्रक्रियेतील किचकट बाबी दूर करून सुटसुटीत प्रक्रिया व्हावी या मागण्या प्रामुख्याने बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडे मांडण्यात येणार आहेत.

नेवासा तालुक्यात कार्यरत असलेल्या सर्वफेडरेशनच्यावतीने लाँग मार्चची जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. हे कामगार येत्या 26 एप्रिलला अकोल्याकडे रवाना होतील असे समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी सांगितले.

सत्ताकेंद्रीत राजकारण करण्यात मजबूर असलेल्या सत्ताधार्यांचे शेतकरी व बांधकाम मजुरांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याकरीता अकोले ते लोणी असा राज्यस्तरीय लाँग मार्च काढण्यात येत आहे. जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने बांधकाम कामगारांनी मोर्चास उपस्थित राहावे असे आव्हान मोर्चाचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी केले आहे.
