कोपरगाव शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत चोरट्यास केले जेरबंद! शहरातील चंद्रहास पैठणी व कोपरगाव साडी सेंटर फोडून केली होती चोरी

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरातील पैठणी साड्यांच्या दालनाचा पत्रा कापून चोरी करणार्यास सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आणि खबर्यामार्फत मिळालेल्या माहितीवरुन अवघ्या 24 तासांच्या आत अटक केली आहे. कोपरगाव शहर पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे व्यापार्यांसह नागरिकांतून जोरदार कौतुक होत आहे.

1 मार्च, 201 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने येवला रस्ता येथील चंद्रहास पैठणी, कोपरगाव साडी सेंटर, साईस्वरुप यामाहा बाईक व समर्थ इलेक्ट्रीक अशा चार दुकानां पत्रा कापून आत प्रवेश करत 52 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याबाबत मनोज लक्ष्मीनारायण जोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास चालू असतानाच यातील अज्ञात चोरट्याने पुन्हा बुधवारी (ता.10) रात्री 12 वाजेच्या सुमारास चंद्रहास पैठणी व कोपरगाव साडी सेंटरचा पत्रा कापून 20 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याबाबत चंद्रहास प्रभाकर भांडगे (रा.येवला) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिलेल्या सूचनांनुसार पोलीस उपनिरीक्षक नागरे, मुख्य हवालदार दिलीप तिकोणे, राजू पुंड, सूरज अग्रवाल, सचिन शेवाळे व राम खारतोडे यांनी घटनास्थळावरिल सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीने अंगावर साडी घेऊन गुन्हा केल्याचे दिसून आले. त्याआधारे शहरातील अशोका हॉटेल ते साई कॉर्नर रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही तपासून आणि गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन अवघ्या 24 तासांत जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील रहिवासी असलेला संजय अर्जुन पाटील (वय 40) यास शिर्डीतील कालिकानगर परिसरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, पकडलेल्या चोरट्याने कोपरगाव व राहाता येथे अशाच प्रकारच्या चोर्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे व्यापार्यांसह नागरिकांतून जोरदार कौतुक होत आहे.
