दोघा परप्रांतीयांचा विवाहितेवर सामुहीक अत्याचार! तालुक्याच्या पठारभागातील धक्कादायक घटना; पंधरवड्यानंतर फूटली प्रकरणाला वाचा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मध्यंतरी एकामागून एक गुन्हेगारी घटनांनी चर्चेत आलेल्या तालुक्यातील पठारभागातून पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत बारा गावचे पाणी पिऊन घारगावात स्थिरावलेल्या दोघा परप्रांतीयांनी संगनमताने एका 26 वर्षीय विवाहितेला कामाचे आमिष दाखवून आळीपाळीने अत्याचार केला. गेल्या महिन्यात घडलेल्या या घटनेनंतर पीडित महिला प्रचंड दहशतीखाली आल्याने तिने घडला प्रकार मनातच दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या हुंदक्यांनी शेजारी राहणार्या महिलेला अत्याचाराची कल्पना आल्याने तब्बल पंधरवड्याच्या विलंबाने या प्रकरणी पाणीपुरीची हातगाडी लावणार्या गणेश प्रजापतीसह मूळच्या नारायणगावच्या मात्र घारगावात बेकरी व्यवसाय करणार्या सैफुल्ला शेख या दोघांवर अत्याचारासह अनुसचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रोसिटी) गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर दोन्ही आरोपी टाळे ठोकून पसार झाले आहेत. धक्कादायक म्हणजे सदर प्रकारणातील घटनास्थळ असलेले मुंढे कॉम्प्लेक्स यापूर्वी घारगावात घडलेल्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातही चर्चेत होते. या प्रकरणातही आरोपींनी पीडितेला कॉम्प्लेक्समधील खोलीत नेवून आळीपाळीने सामुहीक अत्याचार केल्याने सदरची इमारत आणि तेथे घडणार्या घडामोडी पुन्हा पारावर पोहोचल्या आहेत.

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना गेल्या महिन्यात 15 सप्टेंबररोजी सायंकाळी सातच्या सुमारास घारगावमधील मुंढे कॉम्प्लेक्समध्ये घडली. या प्रकरणातील 26 वर्षीय विवाहित महिला आपल्या लहान भावासह अकलापूर रस्त्यावर असलेल्या गणेश प्रजापतीच्या भोलेशंकर भेळ सेंटर या रस्त्यावरील हातगाडीवर पाणीपुरी खाण्यासाठी गेली होती. पीडित महिला परिसरातीलच असल्याने पाणीपुरीवाल्याशी तिची ओळख होती. त्याचाच फायदा घेत आरोपीने तिच्या भावाला कामावर पाठवण्याचा विषय छेडून तिच्याशी जवळीक साधली. त्यावर पीडितेने भावाला कामावर पाठवण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने घरातील साफ सफाईसाठी महिलेची गरज असल्याचे सांगताच पीडितेने त्याला होकार दिला.

आपल्या मनातील हेतू साध्य होत असल्याचे पाहून आरोपीने पीडितेच्या भावाला दुकानावर लक्ष ठेवण्यास सांगून घर दाखवण्याच्या बहाण्याने तिला मुंढे कॉम्प्लेक्समधील आपल्या खोलीवर नेले व तेथे जाताच त्याने पीडितेवर बळजबरी करण्यास सुरुवात केली. त्यातून स्वतःचा बचाव करण्याचा तिचा प्रयत्न अंगात सैतान संचारलेल्या आरोपीसमोर थोटका पडल्याने ती त्याच्या वासनेला बळी पडली. आरोपी गणेश प्रजापतीचा कार्यभाग उरकल्यानंतरही त्याने दमबाजी करीत पीडितेला खोलीतच थांबण्यास भाग पाडले, त्या दरम्यान त्याने मोबाईलवर फोन करीत त्याच्या हातगाडीच्या बाजूलाच बेकरी चालवणार्या सैफुल्ला अबुतय्यब शेख या दुसर्या नराधमालाही खोलीवर बोलावून घेतले.

हा प्रकार धक्कादायक वाटल्याने पीडितेने आरोपी प्रजापतीला विरोध केला असता ‘माझं काम केलं तसं त्याचंही करं, पाच मिनिटे लागतील..’ असे म्हणत त्याकडे दुर्लक्ष केल्याने पीडिता रडू लागली. त्याचवेळी पूर्वनियोजित कटाचा भाग असल्यागत दोघांमधील संभाषणानंतर काही क्षणातच दुसरा सैतान सैफुल्ला बेकरी वार्यावर सोडून तेथे हजर झाला आणि त्याने काहीही न विचारता थेट पीडिता म्हणजे त्याच्या बापाची इस्टेट असल्यागत तिचे लचके तोडले. घरकामासाठी म्हणून घरी घेवून गेलेल्या आरोपीकडून झालेला सामुहीक अत्याचाराचा हा प्रकार पीडितेच्या मनावर खोलवर जखमा देवून गेला.

या घटनेनंतर आपल्या संसाराचे काय होईल?, आपल्या घरातील माणसं काय म्हणतील?, घडला प्रकार कोणाला आणि कसा सांगावा? अशा असंख्य प्रश्नांसह घरी पोहोचलेली पीडिता त्यानंतर शांत राहू लागली, घरातील इतर माणसं कामाला निघून गेल्यानंतर एकटीच कोपरा धरुन हुंदके देवू लागली. आठ-पंधरा दिवसांपासून नियमित सुरु असलेला हा प्रकार संशयीत वाटल्याने पीडितेच्या घराशेजारीच राहणार्या एका महिलेने पीडितेला धीर देत तिला बोलते केले. त्यातून घडला प्रकार तब्बल पंधरवड्यानंतर उघड झाला. या प्रकरणी आज (ता.1) पहाटे उशिराने घारगाव पोलीस ठाण्यात अत्याचारासह अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी लागलीच छापासत्रही राबवले. मात्र तत्पूर्वीच दोन्ही आरोपी पसार होण्यात यशस्वी ठरले. या घटनेने तालुक्याचा पठारभाग पुन्हा चर्चेत आला असून पोट भरण्याच्या बहाण्याने गावात स्थिरावलेल्या परप्रातीयांच्या कारनाम्यांमुळे संताप निर्माण झाला आहे.

घारगावमधील मुंढे कॉम्प्लेक्समध्ये घडलेल्या सामुहीक अत्याचाराच्या या घटनेने ही इमारत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. याच इमारतीत राहणार्या शादाब तांबोळी याने परिसरातील एका मुलीला फसवून बळजबरीने तिचे धर्मांतरण करण्याचा प्रकार केला होता. त्या घटनेवरुन संपूर्ण तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारानंतर पसार झालेला शादाब अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नसताना आता पुन्हा त्याच इमारतीत अत्याचाराची दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे या इमारतीत असलेले व्यवसाय आणि तेथे राहणार्या रहिवाशांचा विषय चर्चेत आला असून इमारतीच्या मालकाने केवळ भाडेकरी अथवा खरेदीदार इतकाच विषय न पाहता गावातील शांतता व सुव्यवस्था आणि सामाजिक सौहार्दाचाही विचार करण्याची गरज या निमित्ताने व्यक्त होत आहे.

