विजय पतसंस्थेने वाहनतळ निर्मिती करावी; नागरिकांची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील गजबजलेल्या चंद्रशेखर चौकातील विजय नागरी पतसंस्थेने वाहनांना उभे करण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नसल्याने येथे कायमच वाहतुकीचा बोजवारा उडतो. या परिसरात भाजीबाजार, शाळा असल्याने विद्यार्थी व पालकांची नेहमीच वर्दळ असल्याने पतसंस्थेने तत्काळ सुरक्षा रक्षकाची नेमणूक करुन वाहनतळाची निर्मिती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

विजय नागरी पतसंस्थेच्या परिसरात भाजीबाजार भरतो, तसेच आजूबाजूला तीन-चार शाळा असल्याने विद्यार्थी, पालक व नागरिकांची कायमच वर्दळ असते. मात्र, पतसंस्थेत येणार्या ग्राहकांसाठी वाहने उभी करण्यास कोणत्याही प्रकारची व्यवस्था केलेली नसल्याने अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होतो. तर गर्दी होवून विद्यार्थ्यांनाही नाहक त्रास होतो. त्यामुळे पतसंस्थेने लवकरात लवकर सुरक्षा रक्षकाची नेमणूक करुन, वाहनतळ निर्मिती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
