संगमनेरच्या पठारभागातील चोर्‍यांचे सत्र थांबेना! घारगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांतून प्रश्नचिन्ह


नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांत शेतकर्‍यांचे वीजपंप सतत चोरीला जात आहे. याबरोबरच घरफोडी, दुचाकी चोरी आणि मारहाणीच्या घटना घडत आहेत. मात्र, अद्यापही वीजपंप चोरणार्‍यांना शोध लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. यामुळे शेतकर्‍यांनी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पठारभागातील बोटा, माळवाडी, केळेवाडी, वनकुटे, हिवरगाव पठार, शेंडेवाडी, खंदरमाळ, माळेगाव पठार आदी गावांमधील शेतकर्‍यांच्या विहिरी, बोअरवेलमधील वीजपंपांना चोरट्यांनी लक्ष्य केलेले आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आधीच शेतमालाला बाजारभाव नाही, त्यात ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी देण्याची वेळ असताना चोरटे मोटारीच घेऊन जात आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. तर दुसरीकडे पोलिसांत चोरीची तक्रार देऊनही त्याचा शोध लागत नसल्याने आर्थिक नुकसान होत आहे. नुकतीच शेळकेवाडी येथील यूवराज लक्ष्मण शेळके यांचा केबलसह वीजपंप तर आंबीखालसा येथून दुचाकी चोरून पोबारा केला आहे.

यापूर्वी अनेक शेतकर्‍यांच्या मोटारी चोरट्यांनी लांबविलेल्या आहेत. मात्र एकाही चोरीचा शोध लावण्यात घारगाव पोलिसांना यश आलेले नाही. याबरोबरच घरफोड्या आणि दुचाकी चोरीचेही प्रकार नित्याचेच झालेले असल्याने नागरिक भयभीत वातावरणात राहत आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच कडक पावले उचलून चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

यापूर्वीचे निष्क्रीय पोलीस निरीक्षक म्हणून ओळख असलेले सुनील पाटील यांची संपूर्ण कारकीर्द वादग्रस्त ठरली. त्यानंतर त्यांच्या जागी संतोष खेडकर यांची वर्णी लागली. त्यांनी सुरुवातीला अपवाद वगळता दोन-तीन धाडसी कारवाया करुन सराईत गुन्हेगारांना गजाआड केले. मात्र, चोरीचे सत्र रोखण्यात त्यांना अपयश येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच सध्या संगमनेर भागाचा प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यभार पाहत आहे. त्यामुळे सर्वच पोलीस ठाण्यांवर नियंत्रण नसल्याचेही यानिमित्ताने अधोरेखीत होत आहे. मात्र, शेतकर्‍यांना चोरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आता तरी घारगाव पोलिसांनी पुढे येऊन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.


संगमनेरचा पठारभाग हा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आहे. त्यासाठी घारगावच्या स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. परंतु, सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याचे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याशिवाय दाखल गुन्ह्यांचा तपास लावण्यातही पोलिसांना यश येत नसल्याने नागरिक भयभीत वातावरणात राहत आहे.

Visits: 423 Today: 1 Total: 1802252

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *