अकोले तालुक्यातील चौदा गावांना अवकाळीचा तडाखा 1 हजार 104 हेक्टरवरील विविध पिकांना बसला फटका
![]()
नायक वृत्तसेवा, अकोले
7 ते 15 एप्रिल दरम्यान अवकाळी वादळी पाऊस व गारपिटीचा अकोले तालुक्यातील चौदा गावांना फटका बसून 1 हजार 104 हेक्टरवरील पिकांना बाधा झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.

एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला होता. हा अंदाज खरा ठरला असून, 7 एप्रिलपासून पावसाला सुरूवात झाली. वादळी वार्यासह झालेल्या पावसाने आणि गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांसह फळबागा, भाजीपाला व चारा पिकांना मोठा फटका बसला आहे. बारी जहागिरदारवाडी, वारंघुशी, मुतखेल, कोंभाळणे, केळी रुम्हणवाडी, टाहाकारी, समशेरपूर, नागवाडी, घोडसरवाडी, सावरगाव पाट, लहित, कोकणेवाडी, चंदगीरवाडी अशा साधारण चौदा गावांतील 1 हजार 506 शेतकर्यांच्या 1 हजार 104 हेक्टरवरील पिकांना बाधा झाली आहे.

आधीच शेतमालाला बाजारभाव नाही. त्यात अवकाळीचे संकट कोसळल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. शासनस्तरावरुन पंचनामे झाले असून, लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे. दरम्यान, यापूर्वी देखील खरीप हंगामात अतिवृष्टी होवून भात, सोयाबीन व बाजरी पिकांची नासाडी झाली होती. त्यानंतर आता पुन्हा अवकाळीने शेतकर्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा केला आहे.

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाला आमदार डॉ. किरण लहामटे, खासदार सदाशिव लोखंडे यांनी भेटी देऊन पाहणी केली. अधिकार्यांनी पंचनामे देखील केले. मात्र, प्रत्यक्षात मदत कधी मिळणार याकडे शेतकर्यांचे लक्ष लागून आहे.
