शिर्डी लोकसभेचा विकास हेच माझे ध्येय ः जाधव काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक
नायक वृत्तसेवा, शिर्डी
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी आग्रही आहेत. यात आता अधिक भर पडली असून, अभियंता असलेले किरण सुधाकर जाधव यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविणार असल्याचे सूतोवाच केले आहे. मतदारसंघातील असंख्य समस्या सोडवण्यासाठी शिर्डी लोकसभेचा विकास हेच माझे ध्येय असून यासाठी ही निवडणूक लढविणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत बोलताना अभियंता किरण जाधव म्हणाले, शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदारांनी अपेक्षेप्रमाणे काम केलेले नाही. त्यामुळे मतदारसंघातील अनेक समस्या व तरुणांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी पुढाकार घेणार असून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब, शोषित वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे ज्येष्ठ माजी मंत्री नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचेही जाधव यांनी म्हंटले आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तरुण हा आपला शेती व्यवसाय सांभाळून देखील उच्च शिक्षण घेत आहे. उच्च शिक्षणाचे माहेरघर म्हणून हा आपला नगर जिल्हा ओळखला जातो. येथे अभियांत्रिकी ते वैद्यकीय असे विविध उच्च शिक्षणाचे महाविद्यालये आहेत. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून गुणवंत विद्यार्थी येथे येऊन शिक्षण घेतात. परंतु दर्जेदार शिक्षण प्राप्त करुन पुढील रोजगारासाठी इतर जिल्ह्यात, राज्यात येथील विद्यार्थी जातो आहे. स्थानिक युवकांना रोजगाराअभावी आसपासच्या शहरात संधी शोधावी लागते. या संघर्षात युवकांचे मनोबल खच्चीकरण होते. शेती व्यवसायाच्या पलीकडे जाऊन आपली क्षमता दाखवून जगाला गवसणी घालण्याची अहमदनगर जिल्ह्यातील युवकांची क्षमता आहे. स्थानिक युवक हा आज पण बेरोजगार आणि निराश आहे.
विशेष म्हणजे शिर्डीची उत्तम कनेक्टिव्हीटी असून देखील येथे मोठ्या उद्योगांना चालना आजपर्यंत मिळालेली नाही. उत्तर नगरमध्ये जर दर्जेदार शिक्षण संस्था आहेत तर आजपर्यंत मोठे उद्योग का आले नाही? यावरुन मतदारसंघात किती समस्या आहेत, याचा उलगडा होतो. विद्यमान खासदारांच्या कार्यपद्धतीवर जनता नाराज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे पक्षाकडूनही शिर्डी लोकसभा निवडणूक लढवावी यासाठी देखील मागणी वाढत आहे. त्यादृष्टीने आपली सगळी तयारी असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे.