माजी सरपंच सीताराम राऊत यांचा पाय आणखी खोलात! दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल; तिघांनी विनयभंग केल्याची महिलेची तक्रार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत घडलेल्या एकामागून एक घटनांनी चर्चेत आलेले घुलेवाडीचे माजी सरपंच सीताराम राऊत यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. घुलेवाडीतील एका महिलेने झाडे तोडण्याच्या कारणावरुन दिलेल्या तक्रारीचा राग धरुन तिघांनी त्या महिलेचा विनयभंग करीत तिच्या सासू-सासर्‍यांना शिवीगाळ व दमबाजी केल्याची फिर्याद दाखल झाली आहे. तब्बल दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेचा गुन्हा मंगळवारी (ता.11) सायंकाळी दाखल झाल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी 4 फेब्रुवारी रोजी घुलेवाडीत राहणार्‍या पीडितेच्या घरासमोर घडला. या घटनेत 36 वर्षीय विवाहितेने तिच्या घराच्या आसपास असलेली झाडे परस्पर तोडण्यात आल्याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याचा राग मनात धरुन वरील दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास घुलेवाडीतील सुनील दगडू रोकडे, राजू यादव खरात व सीताराम पुंजाजी राऊत या तिघांनी पीडित महिलेच्या घरी जावून तिला शिवीगाळ व दमबाजी केली.

यावेळी वरील तिघाही आरोपींनी महिलेचे हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्यही केले. या प्रकाराला विरोध करण्यासाठी पीडिते महिलेचे वृद्ध सासू व सासरे पुढे सरसावले असता ‘त्या‘ तिघांनी त्यांनाही धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या सर्व प्रकारानंतर वरील तिघाही आरोपींनी पीडित महिलेच्या मालकीचे शौचालयही पाडून टाकले व जाताजाता आमच्या नादाला लागायचे नाही असा सज्जड दमही भरला असे पीडितेने शहर पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. त्यावरुन पोलिसांनी रोकडे, खरात व राऊत या तिघांविरोधात भा.दं.वि. कलम 354, 354 (ब), 504, 506, 427 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सीताराम राऊत हे घुलेवाडीचे माजी सरपंच असून त्यांच्यावर यापूर्वीही विनयभंग व अ‍ॅट्रोसीटीसारख्या गंभीर कलमान्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. घुलेवाडीतील एका महिलेच्या वादातून त्यांच्यावर भररस्त्यात हल्ला करण्याचाही प्रकार घडला होता, त्यातून समाज माध्यमात त्यांची बदनामीही करण्यात आली होती. त्यातून सावरण्यापूर्वीच आता त्यांच्यावर विनयभंगाचा आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने त्यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार रफिद्दीन शेख यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *