काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या स्टेट्सवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे! संगमनेर तालुक्यात राजकीय चर्चांना ऊत; अति घाई नडल्याचीही जोरदार चर्चा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्याच्या राजकारणात विद्यमान आणि माजी महसूल मंत्र्याचे राजकीय ‘वैर’ सर्वश्रृत आहे. त्यातून या दोघाही नेत्यांकडून एकमेकांवर राजकीय कुरघोड्या करण्याची एकही संधी दवडली जात नसल्याचेही राज्याने वेळोवेळी पाहीले आहे. दोन दिग्गज नेत्यांच्या या राजकीय द्वंद्वात मात्र त्यांच्या समर्थकांची पूरती दमछाक होत असल्याचेही वेळोवेळी दिसून आले आहे. असाच प्रकार मंगळवारीही समोर आला असून अवकाळीने त्रस्त तालुक्यातील शेतकर्‍यांचा खरा कैवारी कोण यावरुन रंगलेल्या या दोन्ही नेत्यांच्या स्पर्धेत संगमनेर तालुका काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मिलिंद कानवडेच चितपट झाले आहेत. आजी-माजी मंत्र्यांच्या एकाच दिवशी घडलेल्या या दौर्‍याचे श्रेय घेण्यासाठी त्यांच्यासोबत असलेल्या समर्थकांची जणू ओढ लागली होती. त्यातूनच काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याऐवजी घाईघाईत चक्क विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दौर्‍याचे छायाचित्रच आपल्या सोशल ‘स्टेट्स’वर ठेवल्याने संगमनेरातील राजकीय चर्चांना नव्याने फोडणी मिळाली आहे.

गेल्या पाच दिवसांत संगमनेर तालुक्यातील निमगाव, सावरचोळ, पेमगिरी, नांदुरी दुमाला, अंभोरे व कोळवाडा या गावांना अवकाळी व गारपिटीचा मोठा फटका बसला. यापूर्वीही अशाच अवकाळी पावसाने खरीपाच्या पिकांवरही संक्रांत आणल्याने आधीच अडचणीत असलेल्या तालुक्यातील बळीराजाचे जीवनच उध्वस्त केले. त्यामुळे त्यांचे सांत्त्वन करुन त्यांना मदतीचे आश्वासन देण्यासाठी राज्याच्या आजी-माजी मंत्र्यांमध्ये रस्सीखेच होणार हे अटळ होते. वास्तवात घडलेही तसेच, राज्याचे शकट हाकताना असलेला ताण बाजूला सारुन गेल्या सोमवारीच विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरातील अवकाळग्रस्त भागाचा दौरा निश्चित केला होता. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा असल्याने त्यांना त्याकडे दुर्लक्ष करुन नाशिकमध्ये जावे लागल्याने त्यांचा दौरा एक दिवसाच्या लांबणीवर पडला.

त्यादिवशी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही मुंबईत असल्याने त्यांनी कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांना पाठवून शेतकर्‍यांच्या मनात आपली उपस्थिती नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र इंद्रजीत थोरात हे कोणत्याही वैधानिक पदावर नसल्याने त्यांच्या भेटीतून काहीही साध्य होणार नसल्याची चर्चा शेतकर्‍यांमध्ये रंगलेली असतानाच निमगावमधील भाजप नेते सतीश कानवडे यांनी मंगळवारी मंत्री विखे पाटील यांच्या दौर्‍याचा आग्रह धरुन तो निश्चित केला. त्यामुळे तालुक्याचे नेतृत्व असलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यंत्रणेत एकच धावपळ उडाली. कोणत्याही स्थितीत विद्यमान मंत्र्यांच्या दौर्‍यापूर्वी नुकसानग्रस्तांशी आपल्या भेटीगाठी व्हाव्यात याचे नियोजन ठरविले गेले आणि मंगळवारी (ता.11) आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपली सुकन्या डॉ. जयश्री जैन-थोरात यांच्यासह वरील भागातील शेतकर्‍यांच्या थेट बांधावर जावून त्यांच्याशी चर्चाही केली.

नियोजनानुसार केवळ भेटीगाठीच नव्हेतर भेटीची छायाचित्रे, बातम्याही तितक्याच वेगाने पसरवण्याचेही धोरण यंत्रणांनी ठरवलेले होते. ज्या पद्धतीने माजी मंत्री थोरात यांची यंत्रणा कार्यरत होती, त्याचप्रमाणे विद्यमान मंत्री विखे पाटलांची यंत्रणाही दक्ष होती. त्यामुळे आजी-माजी मंत्री बांधावर पोहोचण्यापूर्वी फोटोग्राफर, कॅमेरामेन व कार्यकर्ते तेथे पोहोचले होते. काही अंतराच्या फरकाने जिल्ह्यातील दिग्गज समजल्या जाणार्‍या या दोन्ही नेत्यांनी शेतकर्‍यांच्या भेटीही घेतल्या आणि प्रशासनाला सूचनाही केल्या. त्याची प्रसिद्धी व्हावी यासाठी भेटीची छायाचित्रेही लागलीच समाज माध्यमांसह विविध माध्यमांना पोहोच करण्यात आल्या.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत त्यांच्या विश्वासातील अजय फटांगरे, रामहरी कातोरे व मिलिंद कानवडे यासारखे जिल्हा परिषदेचे माजी सदस्यही होते. वरील भागांना माजी मंत्री थोरात यांनी दिलेल्या भेटीनंतर त्याची प्रसिद्धी करण्यासाठी आणि गावातील आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी या कार्यकर्त्यांची लगबगही यावेळी दिसून आली. त्यातूनच सक्रियतेपासून कोसाने दूर असलेल्या काँग्रेसच्या विद्यमान तालुकाध्यक्षांची दमछाक झाली आणि त्यातच ते गडबडले. दोन्ही नेत्यांच्या ‘बांध’ भेटीची छायाचित्रे सोशल माध्यमात झळकू लागल्याने मिलिंद कानवडे यांची धांदल उडाली आणि त्यांनी आपल्या नेत्याच्या भेटीची छायाचित्रे सोशल ‘स्टेट्स’वर घेण्याऐवजी चक्क पारंपरिक राजकीय वैरी असलेल्या विद्यमान महसूल मंत्र्यांचीच छायाचित्रे ‘अपलोड’ केली.

काही क्षणात काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांचे सोशल स्टेट्स व्हायरल झाले आणि त्यातून जिल्ह्यातील राजकीय चर्चेला नवी फोडणीही मिळाली. कानवडे यांच्या या कृतीतून प्रथमदर्शनी त्यांच्या सोशल माध्यमातील अज्ञानाचे दर्शन घडले, मात्र त्यानंतर काही पत्रकारांनी याबाबत त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतरही त्यांनी ‘चुकून झाले’ या शब्दाचा वापरही टाळल्याने अनेकांच्या भुंवया उंचावल्याचेही दिसून आले. त्यावरुन काँग्रेसच्या विद्यमान तालुकाध्यक्षांची ही चूक अनावधानाने घडली की जाणीवपूर्वक घडवून आणली अशीही चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु झाली आहे. अर्थात अनेकांनी कानवडे यांना घडलेली चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी आपले सोशल ‘स्टेट्स’ बदलले असले तरीही त्यातून उठलेला राजकीय चर्चेचा धुरळा मात्र अजूनही जिल्ह्याच्या आसमंतात दिसून येत आहे.


जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, काँग्रेसचे विद्यमान तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे यांच्याकडून झालेली ही चूक अनावधानाने झाली की त्यांनी जाणीवपूर्वक घडवून आणली यावर तालुक्यात खुमासदार चर्चा रंगत आहेत. यापूर्वी याच महाशयांनी बेकायदापणे गौण खनिजाचा मोठा साठाही करुन ठेवल्याने दीर्घकाळ ते चर्चेत आले होते. आतातर त्यांनी चक्क आपले नेते सोबत असतानाही विरोधी नेत्याची छायाचित्रे प्रसारित केल्याने त्यांच्या राजकीय आकलनाबाबतही चर्चा सुरु झाल्या आहेत.

Visits: 242 Today: 3 Total: 1105984

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *