अंड्यांच्या मागे दडवून गोमांसाची तस्करी! संगमनेर पोलिसांची कारवाई; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील गोवंशाचे कत्तलखाने पूर्णतः बंद असल्याचा स्थानिक पोलिसांचा दावा पोलिसांच्याच कारवाईने पुन्हा एकदा फोल ठरला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे यापूर्वी भाजीपाला, टोमॅटो आणि टरबूजाच्या आड दडवून होणारी गोवंश मांसाची तस्करी यावेळी मात्र कोंबडीच्या अंड्यांमागे दडवून केली जात होती. याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच आज मध्यरात्रीच्या सुमारास अमृतवाहिनी महाविद्यालयाजवळ सापळा लावून बाराशे अंड्यांसह सातशे किलो गोवंशाचे मांस आणि टेम्पो असा एकूण साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार आज मध्यरात्री बाराच्या सुमारास घुलेवाडी शिवारातील अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या समोर घडला. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना याबाबत खबर्‍यामार्फत सूचना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस पथकाला पुणे-नाशिक महामार्गावरील अमृतवाहिनी महाविद्यालयाजवळ सापळा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार शहर पोलिसांनी सापळा लावला असता प्राप्त वर्णनाचे वाहन संगमनेरकडून नाशिकच्या दिशेने येत असल्याचे पोलिसांना दिसले. यावेळी संबंधित टेम्पो चालकाला थांबण्याचा इशारा करुन वाहनाची तपासणी करण्यात आली.


पॅकबंद बॉडीच्या या टेम्पोचा पाठीमागील दरवाजा उघडून बघितले असता सुरुवातीला पोलिसांना काहीही आक्षेपार्ह दिसून आले नाही. मात्र वाहनाचा दरवाजा उघडल्यानंतर त्यातून येणार्‍या दुर्गंधीवरुन पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे त्यांनी सदरील वाहनाची कसून तपासणी केली असता त्यांनाही धक्का बसला. यापूर्वी कोविड संक्रमणाच्या कालावधीत केवळ अत्यावश्यक वाहतूक सुरु असतांना संगमनेरातील काही कसायांनी चक्क भाजीपाला, टोमॅटो व टरबूजाचा वापर करुन त्याखाली गोवंशाचे मांस दडवण्याचा प्रकार वेळोवेळी नाकाबंदीवरील पोलिसांनी उघड केला होता.


यावेळीही पोलिसांना वाहनाच्या पाठीमागील दरवाजातील दर्शनी भागात कोंबडीच्या अंड्यांचे एकूण 60 ट्रे (प्रत्येक ट्रेमध्ये 20 अंडी) उभारुन त्याच्या पाठीमागील बाजूस प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळलेले आणि त्यावर बर्फाचे तुकडे टाकलेले मोठ्या प्रमाणात गोवंशाचे मांस आढळून आले. त्याबाबत विचारणा केली असता वाहनचालकासह त्याच्यासोबत असलेल्या कसायाची भंबेरीच उडाली. मिळालेल्या माहितीनुसार कारवाई फत्ते झाल्यानंतर पोलिसांनी सदरील वाहनासह दोघांना ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणले.


याप्रकरणी पोलीस शिपाई विवेक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी इंझमाम आयाज शेख (वय 24, रा.मदिनानगर) व ऋषीकेश मच्छिंद्र भोसले (वय 20, रा.अलकानगर) या दोघांवर भा.द.वी.कलम 269, 429 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या विविध कलमान्वये वरील दोघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 1 लाख 40 हजार रुपये किंमतीचे गोवंशाचे सातशे किलो मांस, 4 हजार 800 रुपयांचे एकूण 1 हजार 200 अंडे व 2 लाख रुपये किंमतीचा टेम्पो (क्र.एम.एच.17/बी.वाय.6140) असा एकूण 3 लाख 44 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक महाले करीत आहेत. या वृत्ताने शहरातील कत्तलखाने बंद असल्याचा पोलिसांचा दावा पोलिसांनीच फोल ठरवल्याचेही दिसून आले आहे.


कोविड संक्रमणाच्या कालावधीत संगमनेरातून मुंबईकडे गोवंशाचे मांस वाहून नेण्यासाठी भाजीपाला, टोमॅटो, टरबूज, कोबी यांचा वापर केल्याचे त्यावेळी पोलीस कारवाईतून उघड झाले होते. या घटनानंतर असे प्रकार थांबल्याचे दिसत असतांना आता शहरातील कसायांनी पुन्हा एकदा अनोखी शक्कल लढवून चक्क कोंबडीच्या शुभ्र पांढर्‍या अंड्यांच्या मागे कापलेल्या गोवंश जनावरांचे रक्ताने माखलेले लालबुंद मांस वाहून नेण्याचा अपयशी प्रकार घडवण्याचा प्रयत्न केला, मात्र संगमनेर पोलिसांनी कारवाई करीत तो हाणून पाडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *