पोक्सोच्या गुन्ह्यातील ‘फरार’ आरोपीची पीडितेवर प्रचंड दहशत! तालुका पोलिसांची कृती संशयास्पद; पंधरवड्यात दुसर्यांदा पीडितेसह कुटुंबावर हल्ला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गल्लीतील बच्चे कंपनी गडावर फिरायला गेली तेव्हा आरोपीने अवघ्या तेरावर्षीय मुलीसोबत काढलेल्या फोटोचा वापर करुन सलग पाच वर्ष तिच्यावर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केला. त्यानंतर पीडितेचे जमलेले लग्नही मोडून मुलाला फोनवर धमकीही भरली. गेल्या जूनमध्ये घडलेल्या या संतापजनक घटनेला आता पाच महिने पूर्ण होत आहेत. मात्र ‘ढिम्म’ झालेल्या संगमनेर तालुका पोलिसांना अद्यापही आरोपीचा मागमूस लागलेला नाही. एकीकडे पोलिसांच्या मुखी आरोपी तक्रार दाखल झाल्यापासून फरार असला, तरीही दुसरीकडे मात्र तो अचानक पीडितेसमोर हजर होवून तिला सातत्याने दमबाजी, धमकी, शिवीगाळ व मारहाण करीत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या या प्रकारातून आपण खरोखरीच कायद्याच्या राज्यात राहातो का अशी शंकाही पीडितेसह तिच्या कुटुंबाच्या मनात निर्माण झाली आहे. ‘पोक्सो’सारख्या गंभीर गुन्ह्यात अत्याचाराचीही कलमे असलेला आरोपी पंधरवड्यापूर्वी गावात येवून पीडितेला धमक्या देतो आणि त्यानंतर ‘त्या’ विवाहित नराधमाची आई, बहीण आणि दाजी एकत्र मिळून पीडितेसह तिच्या मावशीला गुन्हा मागे घेण्यासाठी बेदम मारहाण करतात हा प्रकार पुरोगामी राज्याचे बिरुद मिरवणार्या महाराष्ट्राला नक्कीच शोभणीय नाही.

याबाबत एकाच पीडितेने पाच महिन्यांच्या कालावधीत एकाच आरोपीविरोधात आणि एकाच पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या अत्याचारासह पोक्सो, मारहाण, शिवीगाळ व धमकी व विनयभंग, मारहाण, शिवीगाळ व धमकी अशा तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांनुसार सोमवारी (ता.६) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडलेला हा तिसरा प्रकार. आज एकोणावीस वर्षीय असलेली पेमगिरीतील पीडित मुलगी आपल्या मावशीसह घरात साफसफाई करीत होती. काही वेळानंतर पीडिता जमा झालेला कचरा उकिरड्यावर फेकण्यासाठी गेली असता २२ जून रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून पसार असलेला मुख्य आरोपी विनोद दत्तू गडकरी याचा ‘दाजी’ तेथून जवळच उभा होता. त्याने कचरा टाकण्यासाठी गेलेल्या पीडितेकडे पाहून अश्लील शिवीगाळ केली. त्याचवेळी त्याची बायको आणि गडकरीची बहीण तेथे अवतरली आणि तिने कायद्याच्या आईचा घोऽ करीत थेट तिच्या झींज्या धरुन तिला ओढीतच आपल्या नवर्याच्या पुढ्यात नेवून उभे केले.

त्यानेही विचार न करता पीडितेच्या कानशिलात देत तिला ढकलून दिले. त्यामुळे पीडित मुलगी खाली पडली. त्यानंतर आरोपी दाजीनेच तिचा कुर्ता पकडून पुन्हा तिला उभे केले आणि महिलांना लज्जा उत्पन्न होईल असा गलिच्छपणा केला. जवळच उकिरड्यावर सुरु असलेला हा गदारोळ कानी गेल्याने पीडितेची मावशी धावतच मुलीच्या मदतीला गेली. मात्र खानदानी नराधम असल्यागत ‘त्या’ दाजीने त्या माऊलीच्या कपड्यांना हात घालून नारीशक्तिचा अवमान केला आणि लाथाबुक्यांनी मारहाणही केली. इतकं सगळं होत असताना विनोद गडकरीसारख्या नराधमाला जन्म देणारी माऊली मागे कशी राहणार?. तिनेही या वादात उडी घेत पीडितेसह तिच्या मावशीला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी हल्लेखोर तिघांनीही विनोद गडकरीवरील ‘पोक्सो’चा गुन्हा मागे घेण्याचा दम भरला. बावचळलेल्या दाजीने तर ‘जे विनोदने केलं, ते मी करील..’ असे म्हणतं ‘त्या’ दोघा अबलांच्या मनात धडकीच भरवली.

जखमी अवस्थेत दोघींनाही घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्यांच्या सूचनेवरुन तालुका पोलिसांनी रुग्णालयात घेतलेल्या पीडितेच्या जवाबावरुन मुख्य आरोपीची आई किरण दत्तू गडकरी, तिची मुलगी व जावई अशा तिघांवर भारतीय दंडसंहितेचे कलम ३५४, (अ), (ब), ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेने पीडितेसह तिचे संपूर्ण कुटुंबच प्रचंड दहशतीखाली आले असून एकीकडे पोलीस तो फरार असल्याचे सांगत असतांना दुसरीकडे तो दररोज गावात येत असल्याचेही पंधरवड्यातील सलग घडलेली ही दुसरी घटना सांगते. त्यामुळे संगमनेर तालुका पोलिसांची भूमिकाही आता संशयास्पद वाटू लागली असून पोक्सोसारख्या गुन्ह्यातील आरोपीचा पाच महिन्यानंतरही मागमूस लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पाच महिन्यांपूर्वी २२ जून रोजी पेमगिरी येथील एका अल्पवयीन मुलीने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ती इयत्ता आठवीत म्हणजे तेरा वर्षांची असताना परिसरातील बच्चे कंपनीसह शहागडावर फिरायला गेली होती. त्यावेळी तेथे असलेल्या आरोपी विनोद दत्तू गडकरी या नराधमाची तिच्यावर नजर खिळली. त्याने मुलांसह तिच्यासोबत स्वतंत्र फोटो काढला. त्यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये त्याने त्या फोटोचा ‘धाक’ दाखवून पीडितेला डोंगराच्या कडेला नेवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दर दोन-तीन महिन्यांनी असा प्रकार घडतच होता. गेल्यावर्षी २०२२ मध्ये पीडितेने संगमनेरातील महाविद्यालयासह पोलीस प्रशिक्षण अकादमीत प्रवेश घेतला. त्यामुळे तिचे बसने नियमितपणे पेमगिरीहून संगमनेरला जाणे-येणे होते.

या दरम्यान गेल्या २५ मे रोजी पीडित मुलगी अकादमीतून बसस्थानकाकडे पायी येत असताना दुचाकीवर आलेल्या आरोपी विनोद गडकरी याने तिला मार्केट यार्डजवळ अडवले. यावेळी त्याने त्याच फोटोचा धाक दाखवून तिला दुचाकीवर बसवून घुलेवाडीतील ‘कुप्रसिद्ध’ कॅफेत नेवून पुन्हा अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांनी पीडितेचे लग्नही जमले. त्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपीने इन्स्टाग्रामवर तिच्या होणार्या नवर्याचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याला ‘तो’ फोटो पाठवला व फोन करुन ‘तू तिच्याशी लग्न केले तर हातपाय तोडून टाकील..’ अशी धमकीही भरली. या सगळ्यातून हिंमत वाढलेल्या या विवाहित नराधमाने १९ जून रोजी पीडितेच्या आईच्या मोबाईलवर फोन करुन पीडितेला झाल्या प्रकरणाची तक्रार दिल्यास अथवा कोणालाही काही सांगितल्यास तिच्यासह कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली.

एकसारख्या घडणार्या या प्रकारांना वैतागून अखेर पीडितेने सगळा प्रकार आपल्या आईसह काकांना सांगितला आणि अखेर ‘त्या’ गावगुंडाच्या दहशती विरोधात कायद्यावर विश्वास ठेवून तालुका पोलीस ठाणे गाठले. भारतीय दंडसंहितेचे कलम ३७६, ३७६ (२), (जे), ५०६, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे कलम ४, ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून ढिम्म असलेल्या संगमनेर तालुका पोलिसांना आरोपीचा मागमूसच काढता आलेला नाही. मात्र दुसरीकडे त्यांच्या तोंडी फरार असलेल्या विनोद दत्तू गडकरी याने आपली आई किरण दत्तू गडकरीसह २० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पीडितेच्या घरी जावून दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी पीडितेला मारहाण केल्याचा व शिवीगाळ करुन धमकी दिल्याचा गुन्हा दाखल आहे. यावरुन तालुका पोलिसांचे कर्तृत्त्वही ठळकपणे दिसून आले आहे.

सध्या संगमनेर तालुक्यातील चारही पोलीस ठाण्यांची अवस्था सारखीच आहे. मुख्यालयी वेगळाच ‘घाट’ सुरु असल्याने त्याची यंत्रणा बसविण्यात अधिकारी वर्ग व्यस्त आहेत. त्यामुळे अशा सामान्यांच्या किरकोळ गोष्टींकडे बघायला त्यांना फुरसतच नाहीये. मग असे असताना तालुका पोलिसांची हद्द त्याला अपवाद कशी राहणार?. एकीकडे घारगाव पोलीस आपल्या हद्दित मृत्यू पावलेल्या दोघांना माणसाने मारलं की वाघाने हेच शोधू शकलेले नाहीत, तर दुसरीकडे तालुका पोलिसांच्या हद्दीत सगळंच आलबेल आहे. संगमनेर शहरात तर रामराज्यच अवतरले आहे आणि आश्वीचे तर क्या कहने! अशी एकूण तालुक्याची अवस्था आहे. त्यातच सामान्यांसाठी अतिशय धक्कादायक आणि तितक्याच संतापजनक असलेल्या या घटनेकडेही पोलिसांचे दुर्लक्ष जिल्ह्याचा ‘बिहार’ होण्याचे संकेत देत आहे.

