संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन! गोरक्षनाथ मदने; ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी, मिलिंद भागवत व सुशील कुलकर्णी यांची उपस्थिती…


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्याला पत्रकारितेचा समृद्ध वारसा लाभला आहे. गेल्या दोन शतकांमध्ये मराठी पत्रकारितेने विविध स्थित्यंतरे अनुभवताना आपला हा वारसा अधिक समृद्धपणे पुढे नेण्याचे काम केले आहे. सध्या जगात सामाजिक माध्यमांचा बोलबाला असतानाही वृत्तपत्र व चलचित्र माध्यमांनी आपली विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे. यापुढील काळही पत्रकारांसाठी बदल आणि आव्हानांचा असणार आहे. अशा बदलांचा आजच्या पत्रकारांनी कसा सामना करावा हा विषय घेवून संगमनेर श्रमिक पत्रकार संघाने या महिन्याच्या शेवटच्या दिवशी पत्रकारांसाठी संगमनेरात जिल्हास्तरीय एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती संघाचे अध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी दिली.

संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार आणि समाज यांना केंद्रस्थानी ठेवून यापूर्वी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी रविवार दिनांक 30 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादक, लेखक सुनील माळी यांच्या बातमीदारांपुढील आव्हाने आणि प्रिंट मीडियाचे बदलते स्वरूप या विषयावरील व्याख्यान होणार आहे. कार्यशाळेच्या दुसर्‍या सत्रात आयबीएन-लोकमतचे निवेदक मिलिंद भागवत यांचे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे स्वरूप व त्यापुढील नवी आव्हाने या विषयावरील अभ्यासपूर्ण व्याख्यान होईल.

तर कार्यशाळेच्या तिसर्‍या सत्रात महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांचे संपादक म्हणून काम केलेले ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी सध्याच्या विविध सामाजिक माध्यमांच्या अनुषंगाने पत्रकारांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ स्तंभलेखक, संपादक व प्रकाशक घनश्याम पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यशाळा सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी पूर्णवेळ आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत सहभागी होणार्‍या विविध माध्यमांच्या पत्रकारांना संयोजकांच्यावतीने लेखन साहित्य, चहा-पान, अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यशाळेत सहभागी होणार्‍या पत्रकारांसाठी नोंदणी शुल्क 100 रुपये इतके निश्चित करण्यात आले आहेत. कार्यशाळेत सहभागी होणार्‍यांसाठी नावनोंदणी अनिवार्य आहे. त्यासाठी पत्रकार संघाने उपलब्ध करुन दिलेल्या ऑनलाईन पोर्टलवर नावे नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या दिवशी महाराष्ट्रातील विविध पत्रकार व संपादकांनी लिहिलेल्या माध्यमांविषयीच्या पुस्तकांचे प्रदर्शन व विक्रीची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

दिवसभरातील तीन सत्रात होणार्‍या या पत्रकार कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील अधिकाधिक पत्रकारांनी नावनोंदणी करावी असे आवाहन संघटनेचे उपाध्यक्ष गोरक्ष नेहे, सचिव संजय अहिरे यांच्यासह प्रकल्प समितीच्यावतीने नितीन ओझा, श्याम तिवारी, संदीप वाकचौरे, आनंद गायकवाड, शेखर पानसरे, मंगेश सालपे, सतीश आहेर, सचिन जंत्रे, सुशांत पावसे, अंकुश बुब, नीलिमा घाडगे, सोमनाथ काळे, धिरज ठाकूर, अमोल मतकर, सुनील महाले, भारत रेघाटे, काशिनाथ गोसावी, संजय साबळे, हरीभाऊ दिघे आदिंनी केले आहे.

Visits: 172 Today: 1 Total: 1587911

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *