धार्मिक स्थळांवरील ध्वनीक्षेपकांसाठी पोलिसांची परवानगी आवश्यक! पारंपारिक ध्वनीक्षेपकांना निकषांच्या अधीन राहून परवानगी; अन्यथा कारवाई होणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
धार्मिक स्थळांवरील ध्वनीक्षेपकांवरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले आहे. त्या अनुषंगाने पोलीस महासंचालकांनी सर्वोच्च न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि पर्यावरण (संरक्षण) व ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना राज्य पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांना कारवाईचे आदेश बजावले असून जिल्ह्यातील कोणत्याही धार्मिकस्थळावर विनापरवानगी ध्वनीक्षेपक आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संगमनेर तालुक्यातील सर्व धार्मिक स्थळांनी विहीत नमुन्यात ध्वनीक्षेपक परवानगीसाठी अर्ज दाखल करण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी केल्या आहेत.

याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार महेश बेडेकर व इतरांनी 2010 साली मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केल्या आहेत. त्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने याबाबत वेळोवेळी मार्गदर्शक सूचना व आदेश जारी केलेले आहेत. त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषणाबाबत पाळावयाच्या नियमांबाबत संपूर्ण राज्यात एकसूत्री प्रणाली असावी यासाठी पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 व ध्वनी प्रदूषण कायदा 2000 अन्वये कारवाई करतांना प्रमाणित सुधारित कार्यप्रणाली निर्गमित करण्यात आली असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या न्याय निर्णयातील निर्देशांचे तसेच, राज्याच्या पोलीस महासंचालकांनी या संदर्भात दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश याद्वारे देण्यात आले आहेत.


या आदेशाद्वारे जिल्ह्यातील सर्व धार्मिकस्थळांवरील ध्वनीक्षेपकासाठी पोलिसांची परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले असून त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेली वेळ व आवाजाची मर्यादा पाळावी लागणार आहे. त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 च्या कलम 15 अन्वये कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. धार्मिकस्थळांवरील ध्वनीक्षेपकांसाठी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंतच्या कालावधीतच परवानगी देण्यात येणार असून आवाजाची मर्यादा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार क्षेत्रीय वर्गीकरण करुन ठरविण्यात येणार आहे. अधिकृतपणे अर्ज करुन परवानगी घेतली असली तरीही कोणत्याही धार्मिक स्थळाजवळील रहिवाशांनी त्याबाबत तक्रार केल्यास ध्वनीक्षेपक बंद करण्याचा अधिकार पोलिसांना असणार आहे. अशा ठिकाणी वाजविल्या जाणार्‍या ध्वनीक्षेपकाद्वारा नागरिकांना, वृद्ध, रुग्ण व विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक त्रास होणार नाही याची संपूर्ण जबाबदारीही संबंधित धार्मिक स्थळांवर सोपविण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम 2000 चे कलम 8 नुसार दिलेल्या नोटीसचे उल्लंघन केल्यास अशा धार्मिक स्थळांना दिलेला परवाना रद्द करण्यात येणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे धार्मिक स्थळांना केवळ धार्मिक कार्यक्रमांसाठीच ध्वनीक्षेपक वाजविण्याची परवानगी मिळणार आहे. अशा पवानगीने कोणत्याही धार्मिक स्थळावरुन अन्य धर्मियांच्या भावना अथवा व्यक्तिगत भावना दुखावता येणार नाही, तसेच कोणीही प्रक्षोभक भाष्य करणार नाही याची जबाबदारी परवाना प्राप्त करणार्‍या विश्वस्तांची असणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांनी आवाजाची मर्यादा मोजणारी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशही पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. याबाबत दाखल होणार्‍या अर्जानुसार परवानगी देताना पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांनी कायद्यातील तरतुदींचा बारकाईने अभ्यास करुन, स्थानिक परिस्थितीची जाणीव ठेवून व वेळांच्या मर्यादेत योग्य अटी व शर्ती नमूद करुनच ध्वनीक्षेपकांना परवानगी द्यावी असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात असणार्‍या धार्मिक स्थळांना आता आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यांमध्ये ध्वनीक्षेपकासाठीचे अर्ज दाखल करावे लागणार असून प्रत्येक धार्मिक स्थळाला परवानगी घेणे अनिवार्य असणार आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली असून चार श्रेणीत विभागवारपणे त्याचे वर्गीकरणही देण्यात आले आहे.

त्यानुसार (अ) श्रेणीत औद्योगिक क्षेत्राचा समावेश असून सकाळी 6 ते रात्री 10 यावेळेत या क्षेत्रातील अधित्तम ध्वनीक्षेपकाची मर्यादा 75 डेसिबल, (ब) श्रेणीतील व्यापारी क्षेत्रात 65 डेसिबल, (क) श्रेणीतील निवासी क्षेत्रात 55 डेसिबल तर (ड) श्रेणीतील शांतता क्षेत्रात आवाजाची मर्यादा 50 डेसिबलपेक्षा अधिक वाढवण्यास परवानगी नसेल. या नियमाचे उल्लंघन करणार्‍या धार्मिकस्थळांचे परवाने रद्द करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही पोलीस अधीक्षकांनी बजावले आहेत.

राज्याचे पोलीस महासंचालक व पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशानुसार पारंपारिक पद्धतीने सुरु असलेल्या सर्व धार्मिक स्थळांवरील ध्वनीक्षेपकांना नियम व शर्ती ठेवून परवानगी दिली जाणार आहे. त्यासाठी अशा धार्मिक स्थळांनी आपल्या नजीकच्या पोलीस ठाण्यांमध्ये विहित नमून्यातील अर्ज दाखल करावेत. त्या त्या अर्जानुसार अभ्यास करुन परवानगी देण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी अथवा परवानगी मिळवण्यासाठी कोणतीही अंतिम कालमर्यादा ठरविण्यात आलेली नाही, त्यामुळे धार्मिक स्थळांनी परवानगीसाठी एकाचवेळी गर्दी न करता लवकरात लवकर पोलिसांकडे अर्ज करुन ध्वनीक्षेपकाची परवानगी घ्यावी. विनापरवानगी ध्वनीक्षेपक वाजविल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल.
– राहुल मदने
उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर

Visits: 127 Today: 1 Total: 1414838

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *