अवकाळीने संगमनेर तालुक्यातील बळीराजा उध्वस्त! साडेचारशे हेक्टरवरील पिकांची नासाडी; अठरा घरांची अंशतः पडझड


नायक वृत्तसेवा, संगमनेर
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राने गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने आधीच अडचणीत असलेल्या बळीराजाचा पाय आणखी खोलात नेला आहे. याबाबत नुकसानग्रस्त भागाची तातडीने पाहणी करुन नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला असून त्यात संगमनेर तालुक्यातील 430 हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नासाडी झाल्याचे समोर आले असून साडेतीनशे हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामेही सुरु करण्यात आले आहेत. याशिवाय तालुक्याच्या विविध भागातील 18 घरांची अंशतः पडझडही झाली असून सुदैवाने त्यात कोणतीही प्राणहानी झाली नसल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

गेल्या शुक्रवारी विजांच्या कडकडाटासह तालुक्याच्या बहुतेक भागात सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊस व गारपीट झाली. त्याचा सर्वाधिक फटका तालुक्यातील निमगाव खुर्द व बुद्रुक, सावरचोळ, पेमगिरी, नांदुरी दुमाला, अंभोरे व कोळवाडा या भागाला बसला आहे. गारपिटीने या भागातील उन्हाळ कांदा, टोमॅटो, झेंडू, मका, डाळींब यासह भाजीपाला व चारा पिकांनाही बसला आहे. गेल्या शुक्रवारपासून रविवारपर्यंतच्या कालावधीत झालेल्या अवकाळीने 430 हेक्टरवरील पिकांचे नुकसान केल्याचा प्राथमिक अंदाज असून त्यातील साडेतीनशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामेही सुरु करण्यात आले आहेत. शुक्रवारच्या अवकाळीने या भागातील एकूण 18 घरांची अशंतः पडझडही झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पावसाळ्यात दीर्घकाळ लांबलेल्या पावसाने शेतीच्या झालेल्या नुकसानीतून सावरत असलेल्या शेतकर्‍याची खरीपावरच भिस्त अवलंबून होती. मात्र खरीपाची पिकं काढणीला आली त्यावेळी राज्यात अवकाळीने थैमान घातल्याने बळीराजाला लागोपाठच्या नुकसानीचा सामना करावा लागला. त्यातून सावरत असताना आता निसर्गाने रब्बी पिकांवरही घाव घातल्याने राज्यासह तालुक्यातील बळीराजा अक्षरशः उध्वस्त झाला आहे. सध्या तालुक्यातील बहुतेक भागात उन्हाळ कांदा काढण्याचे काम सुरु असतानाच अवकाळीने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांना काढून ठेवलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचीही संधी मिळाली नाही.

अवकाळीसह तालुक्याच्या आठ गावांना गारपिटीनेही झोडपून काढल्याने शेतातील मका, झेंडू, टोमॅटो व भाजीपाल्याची उभी पिकं आडवी झाली आहेत. सोबतच उन्हाळ कांद्याच्या शेतात रचलेल्या राशींसह काही भागातील काढलेल्या गव्हाची पिकंही भिजल्याचे वृत्त आहे. गेल्या वर्षभरापासून एकामागून एक आस्मानी संकटांनी बळीराजाला सावरण्याची संधीच न दिल्याने अल्पभूधारक शेतकरी पार कोलमडून गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले असले तरीही त्यातून मिळणारी शासकीय मदत अगदीच तोकडी असल्याने त्यातून बळीराजा सावरण्याची शक्यताही धुसरच आहे.


गेल्या तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तालुक्यातील आठ गावांमधील सुमारे साडेचारशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले असून 18 घरांची पडझडही झाली आहे. सद्यस्थितीत साडेतीनशे हेक्टर शेतजमीनीवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून आज दुपारनंतर अथवा मंगळवारी राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नुकसानग्रस्त भागांना भेटी देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Visits: 214 Today: 1 Total: 1112515

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *