संगमनेरातील साळीवाडा येथे लवकरच साकारणार खंडोबा मंदीर! जिर्णोद्धार कामासाठी सढळ हाताने दान करण्याचे मंदीर व्यवस्थापनाकडून आवाहन..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे खंडोबा महाराजांचे संगमनेर शहरातील साळीवाडा येथे जागृत देवस्थान आहे. विशेष म्हणजे स्वयंभू देवस्थान असल्याने शहरवासियांसह तालुक्यातील भाविकांचे ते श्रद्धास्थान बनले आहे. आज (शुक्रवार ता.6) या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक विश्वास मुर्तडक यांच्या हस्ते सपत्नीक भूमिपूजन करण्यात आले. लवकरच भव्यदिव्य मंदीर साकारण्यासाठी भाविकांनी सढळ हाताने दान करावे, असे आवाहनही यावेळी मंदीर व्यवस्थापनाकडून करण्यात आले.

महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे मल्हार मार्तंड खंडोबा महाराजांनी भाविकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले आहे. ठिकठिकाणी खंडोबा महाराजांच्या मंदिराची निर्मिती झालेल्या आहेत. जेजुरी, कोरठण आणि दावडीचा खंडोबाची ख्याती सर्वश्रृत आहे. दरवर्षी भाविक माघ पौर्णिला जेजुरीला दर्शनासाठी जातात. राज्यभरातून अनेक मानाच्या काठ्या वाजत-गाजत जेजुरीला पोहोचतात. तसेच चंपाषष्ठीलाही कोरठण खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. संगमनेर तालुक्यातही अनेक ठिकाणी खंडोबा महाराजांची मंदिरे आहेत. शहरातील साळीवाडा येथेही मल्हार मार्तंड खंडोबा महाराजांचे स्वयंभू देवस्थान आहे. या मंदिराच्या परिसरात दोन पाण्याचे आड आहेत. या आडातूनच खंडोबा महाराजांच्या मूर्ती निघाल्याची आख्यायिका सांगितली जाते. यामुळे स्वयंभू खंडोबा महाराजांवर शहरवासियांवर तालुक्यातील भाविकांची अपार श्रद्धा जडली आहे.

दरम्यान, जेजुरीच्या यात्रेला शहरातून जाणारी मानाची होलम राजाची काठी दर्शन घेऊन परतल्यावर महात्मा फुले चौकात विसाव्यासाठी थांबल्यानंतर येथील खंडोबाच्या दर्शनासाठी जाते. यावेळी येथील आडाच्या पाण्याला काठी स्पर्श करते त्याचवेळी आडाचे पाणी उसळते अशी भाविकांची धारणा आहे. मात्र, भव्यदिव्य स्वरुपात मंदिराची निर्मिती व्हावी यासाठी शहरातील अनेक दानशूर आणि भाविकांनी पुढाकार घेतला असून आहे. त्याला मूर्तरुप देण्यासाठी आज (शुक्रवार ता.6) माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांच्या हस्ते सपत्नीक भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आप्पा केसेकर, मदन पारख, राजगोपाल पडतानी, श्रीगोपाल पडतानी, डॉ.योगेश भुतडा, नगरसेवक किशोर पवार, शंकर रहाणे, शरद गुजांळ, डॉ.मालपाणी, सी.ए. झंवर, पुरूषोत्तम जोशी, संजय कर्पे, भाऊसाहेब अभंग, श्री.रहाणे, अण्णा वडतिल्ले, किसन ढोबें, अण्णा रहाणे, दिलीप गुजांळ, गोविंद भरीतकर, सुभाष ताजणे, शरद शिंदे, भारत काळे आदिंसह खंडोबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी अनेक भक्तांनी मंदीर जिर्णोद्धारकरिता देणगी जाहीर केली. त्याबद्दल मंदीर व्यवस्थापनाकडून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच आजपासून रोज सायंकाळी सात वाजता आरती होणार असून भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करुन हजर रहावे. तर लवकरात लवकर मंदीर पूर्णत्वास नेण्यासाठी भाविकांनी वस्तू अथवा रोख स्वरूपात आप्पा केसेकर व मदन पारख याच्यांकडे देणगी द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Visits: 183 Today: 1 Total: 1415936

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *