संस्कार बालभवनच्या मुलांनी साकारले अकरा मारुती! हनुमान जन्मोत्सव; समर्थ रामदासांच्या रामभक्तीचे घडले दर्शन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गीता परिवार संचालित संस्कार बालभवनमध्ये हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या विविध ठिकाणच्या अकरा मारुतींच्या वेशभूषा करुन मुलांनी उपस्थितांना शिवकाळाचे दर्शन घडवले. यावेळी बालभवनमध्ये जमलेल्या पालक व नागरिकांच्या उपस्थितीत हनुमानरुपी बालकांचे पूजन करण्यात आले. यानंतर मारुतीस्तोत्र आणि हनुमान चालीसाच्या पठणानंतर बजरंग बली की जयच्या घोषाने वातावरण दुमदुमून गेले होते.

यंदाच्या हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने गीता परिवाराच्या संस्कार बालभवनमधील सर्व मुलांना महाबली हनुमानाच्या तर मुलींना अंजनी मातेच्या वेशभूषेत बोलावण्यात आले होते. यावर्षी शिवकाळात समर्थ रामदास स्वामींनी राज्याच्या कानाकोपर्यात स्थापन केलेल्या विविध अकरा मारुतींच्या वेशभूषा बालकांनी साकारल्या होत्या. त्यात चाफळ येथील वीरप्रताप मारुती, शिंगणवाडी येथील खडीचा मारुती, माजगावचा मारुती, उंब्रज येथील मठातील मारुती, चाफळ येथील दास मारुती, शहापूर येथील चुन्याचा मारुती, बत्तीस शिराळा येथील शिराळ्याचा मारुती, मनपाडळे मारुती, मसूर येथील महारुद्र हनुमान, पारगाव येथील बाल मारुती, बहे-बोरगावचा मारुती इत्यादी ठिकाणच्या मारुतीच्या वेशभूषा मुलांनी हुबेहूब साकारल्या होत्या. हनुमान चालीसाच्या सामूहिक पठणानंतर पालकांच्या हस्ते सर्व अकरा हनुमानांची विधीवत पूजा व आरती करुन प्रसादाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी मुलांचे पालक व अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व बालगोपाळ व त्यांच्या पालकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, संस्कार बालभवनच्या संचालिका अनुराधा मालपाणी, राष्ट्रीय सहसचिव गिरीश डागा यांच्या मार्गदर्शनाखाली बालभवनच्या प्रशिक्षिका रुपाली रायकर, ज्योती भालेराव, स्वराली संत, ईश्वरी सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
