संगमनेर नगरपरिषदेच्या दोन प्रभागांना अनुसूचित जातीचे आरक्षण! दोन्ही प्रभागातून प्रत्येकी एक उमेदवार; पन्नास टक्के महिलांसह उर्वरीत सर्वजागा खुल्या..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील ओबीसी आरक्षणाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसतांना मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम मात्र पुढे सरकू लागला आहे. त्याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आज सकाळी 11 वाजता पालिकेच्या कार्यालयात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या दोन जागांसाठी आरक्षणाच्या सोडती जाहीर करण्यात आल्या. त्यात लोकसंख्येच्या दृष्टीने शहरातील सर्वात मोठा ठरलेल्या प्रभाग क्रमांक 13 सह सर्वात लहान असलेल्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. शहरातील उर्वरीत सर्व प्रभागांमध्ये महिलांच्या पन्नास टक्के आरक्षणासह 28 सदस्य जागा खुल्या वर्गासाठी असणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या राज्यातील 208 नगरपरिषदांसह आठ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात (ता.9) यासर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या द्विसदस्यीय प्रभागांची अंतिम रचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर लागलीच आयोगाने इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) वगळून अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या आरक्षण सोडतींचा कार्यक्रमही जाहीर केला होता. त्यानुसार गेल्या शुक्रवारी (ता.10) जिल्हाधिकार्‍यांनी अधिसूचनाही प्रसिद्ध केली होती. त्याप्रमाणे आज (ता.13) सकाळी 11 वाजता पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे व मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी शहरातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत सोडती काढून संगमनेरात लागू असलेल्या अनुसूचित जातीच्या दोन जागांचे आरक्षण जाहीर केले आहे.


त्यानुसार नवीन द्विसदस्यीय प्रभागरचनेत शहरात सर्वात मोठा ठरलेला प्रभाग क्रमांक 13 (अ) अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. या जागेवर अनुसूचित जातीमधील महिला अथवा पुरुष कोणीही उभे राहू शकेल. तर 13 (ब) या दुसर्‍या जागेवर मात्र सर्वसाधारण गटातील महिलेलाच उमेदवारी द्यावी लागणार आहे. अनुसूचित जातीगटातील दुसर्‍या जागेचे आरक्षण शहरातील सर्वात लहान असलेल्या प्रभाग दोनमधील (अ) गटाला लागले असून या प्रभागात अनुसूचित जातीच्या महिलेला संधी मिळणार आहे. याच प्रभागातील दुसरी जागा मात्र सर्वसाधारण गटासाठी खुली असणार आहे. या दोन प्रभागातील दोन जागांशिवाय उर्वरीत सर्व प्रभागात मिळून असलेल्या 28 जागा सर्वसाधारण गटासाठी खुल्या असून त्यातील निम्म्या म्हणजे 14 जागा सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित असणार आहेत.

आजच्या आरक्षण सोडतींवर कोणाच्या आक्षेप, हरकती अथवा सूचना असतील तर त्यांना 15 ते 21 जून या कालावधीत त्या दाखल करता येतील. त्यानंतर विभागीय आयुक्तांकडून आरक्षण रचनेला मान्यता मिळाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून येत्या 1 जुलैरोजी आज जाहीर झालेल्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी सन 2011 सालच्या जनगणनेचा आधार घेण्यात आला असून संगमनेर शहर नगरपालिका हद्दितील एकूण लोकसंख्या 65 हजार 804 गृहीत धरण्यात आली आहे. शहरातील अनुसूचित जातीच्या 3 हजार 478 तर अनुसूचित जमातीच्या 1 हजार 64 नागरीकांचा यात समावेश असून आयोगाच्या आरक्षण सूत्रानुसार संगमनेरात केवळ अनुसूचित जातीसाठी आरक्षण लागू झाले आहे.

आज सकाळी संगमनेर नगरपालिकेच्या कार्यालयात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, भाजपाचे शहराध्यक्ष अ‍ॅड.श्रीराम गणपुले, शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी, प्रसाद पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत वामन, जावेद जहागिरदार, नितीन अभंग, किशोर पवार, किशोर टोकसे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 157 Today: 2 Total: 1112449

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *