मुळा नदीकाठावर बिबट्याच्या जोडीसह दोन बछड्यांचा संचार
मुळा नदीकाठावर बिबट्याच्या जोडीसह दोन बछड्यांचा संचार
वळण परिसरात दहशतीचे वातावरण; पाळीव प्राण्यांचाही पाडला फडशा
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील वळण येथील मुळा नदीकाठावर नर-मादी बिबट्याची जोडी दोन बछड्यांसह फिरताना दिसत आहे. बिबट्याच्या या कुटुंब काफिल्याने मागील चार दिवसांपासून परिसरात दहशत निर्माण केली आहे. त्यांनी चार कुत्रे व एका वासराचा फडशा पाडला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे.
दरम्यान, गुरुवारी (ता.8) पहाटे साडेपाच वाजता त्यांनी विजय आढाव यांच्या वस्तीवरील पाळीव कुत्र्यावर हल्ला चढविला. वस्तीवरील नागरिक जागे झाल्याने तेथील कुत्रे वाचले. वळण येथे राजदेव वस्ती, डमाळे वस्ती व वीटभट्टी परिसरात बिबट्यांनी पाळीव प्राण्यांवर हल्ले चढविले. शिवनाथ डमाळे यांच्या गोठ्यातील वासरु बिबट्यांनी ठार केले. मागील चार दिवसांत परिसरातील चार कुत्रे बिबट्यांनी फस्त केले. ऋषीकेश आढाव, रमेश आढाव, बाबुराव डमाळे, भागवत डमाळे, अनिल राजदेव, गणेश राजदेव, बाळासाहेब देशमुख, कुर्बान शेख, इसाक शेख यांना बिबट्यांच्या कुटुंब काफिल्याने दर्शन घडविले. काहींनी नर-मादी व एक बछडा; तर, काहींनी मादी व दोन बछडे पाहिले.
सध्या वळण येथील मुळा नदीपात्रात पाणी आहे. आसपास उसाचेही मोठे क्षेत्र आहे. बिबट्यांना लपण्यास भरपूर जागा असल्याने त्यांनी या भागात ठाण मांडले आहे. नागरिकांनी बंद पडलेले पथदिवे सुरू केले आहेत. रात्रीच्या वेळी घरांच्या व गोठ्यांच्या जवळ पुरेसा उजेड राहण्यासाठी व्यवस्था केली आहे. मात्र, त्यांच्या दहशतीमुळे दिवसा देखील शेतात जाण्यास ग्रामस्थ घाबरत आहेत. वनखात्याचे कर्मचारी लक्ष्मण किनकर यांनी तात्काळ एक पिंजरा उपलब्ध करून दिला असून, तो राजदेव वस्ती येथे बसविण्यात आला आहे.