नागपंचमीच्या उत्साहाला संगमनेरात लागली दुःखाची किनार! बसस्थानकासमोर दुर्दैवी अपघात; भररस्त्यात उभ्या वाहनांनी घेतला महिलेचा बळी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सर्वत्र हर्षोल्हास निर्माण करणार्‍या श्रावणमासातील पहिल्याच उत्सवाला संगमनेरात दुःखाची किनार लागली आहे. आपल्या मोपेड दुचाकीवरुन संगमनेरात येत असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याच्या वाहनाला अन्य वाहनाचा धक्का लागल्याने शेजारुन चाललेल्या मालवाहतूक ट्रकखाली सापडून सत्तर वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांपासून बसस्थानकासमोरील परिसराचा ताबा श्रीरामपूरच्या खासगी प्रवासी वाहतूकदारांसह मालवाहतूक करणार्‍या रिक्षांनी घेतल्याने या परिसरात नेहमीच अपघाताची शक्यता दाटलेली असते, आज एका सत्तर वर्षीय वृद्धेचा बळी घेत ती वास्तवात उतरली आहे. पालिका आणि पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेवून येथील अतिक्रमणांसह बेकायदा निर्माण झालेला खासगी वाहनतळ तत्काळ हटविण्याची मागणी होत आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज (ता.2) नागपंचमीच्या दिनी सकाळी साडेनऊच्या सुमारास कारभारी शिंदे (वय 75, रा.ओझर खु.) हे आपली पत्नी विमल (वय 70) यांच्यासह मोपेडवरुन हॉटेल काश्मिरकडून संगमनेर शहराच्या दिशेने येत होते. त्याचवेळी बसस्थानक चौकाच्या समोरील बाजूला नवीन नगर रस्त्याकडे वाहनांची ये-जा सुरु असल्याने महामार्गावर नाशिककडून येणारी वाहतूक काही प्रमाणात रोडावली होती. त्यातून मार्ग काढीत काही दुचाकीस्वार मार्गस्थ होत असल्याचे पाहून कारभारी शिंदे यांनीही आपले मोपेड दोन वाहनांच्या मधून काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या उजव्या बाजूला अगदी रस्ता दुभाजकाला लागूनच एक मालट्रकही हळूहळू पुढे सरकत होता.


नेमकं याचवेळी कारभारी शिंदे यांच्या मोपेडला त्यांच्या डाव्याबाजूने आलेल्या वाहनाचा धक्का लागल्याने त्यांचे मोपेडवरील संतुलन बिघडले. त्यातून सावरत असतांनाच बसस्थानक चौकातील वाहतूक मोकळी झाल्याने वाहने पुढे सरकू लागली. त्यामुळे त्यांना सावरण्याची संधी मिळण्यापूर्वीच ते दोघेही मोपेडसह महामार्गावर पडले त्यातही विमल शिंदे या क्लिनर साईडच्या बाजूने मालट्रकच्या चाकांखाली सापडल्याने चिरडल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडतात आसपासच्या नागरीकांनी लागलीच मदतीसाठी धाव घेतली. काहींनी किरकोळ जखमी झालेल्या कारभारी शिंदे यांना बाजूच्या एका दुकानात बसवून ठार झालेल्या त्यांच्या पत्नीला रुग्णवाहिकेतून कॉटेज रुग्णालयात पाठविले.


याबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी परिसरात मोठी वाहतूक कोंडी होवून गर्दी उसळलेली असल्याने पोलिसांनी गर्दी हटवून वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त वाहने बाजूला घेत जखमी असलेल्या कारभारी शिंदे यांना रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.


गेल्या काही वर्षांपासून बसस्थानक परिसरातील अतिक्रमणांमध्ये मोठी वाढ होण्यासह लाकडाच्या मिलबाहेर श्रीरामपूर येथील खासगी प्रवाशी वाहतूकदार व संगमनेरातील मालवाहतूक वाहनांनी बेकायदा आपला तळ उभी केला आहे. या मंडळींकडून कधीही महामार्गावरील वाहतूकीचे नियम पाळले जात नाहीत, त्यामुळे भररस्त्यातच वाहने उभी करुन प्रवाशांना हळ्या ठोकणे, याच परिसरात दोन-चार प्रवाशी वाहनात बसवून कासवगतीने घिरट्या घालणे असे प्रकार नेहमीच सुरु असतात. त्यामुळे या मार्गावरुन चालतांना पादचारी, वयस्कर, महिला व विद्यार्थी दुचाकीस्वार यांना जीव धोक्यात घालूनच दुचाकी चालवावी लागते. या बेकायदा वाहनतळानेच आज नागपंचमीच्या उत्सवाला दुःखाची झालर लावली असून पोलीस आणि पालिका प्रशासनाने ही घटना गांभीर्याने घेवून येथील परिसर अतिक्रमण मुक्त करण्यासह वाहनतळ मुक्त करण्याची मागणी होत आहे.

Visits: 23 Today: 2 Total: 117563

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *