पावसाचा जोर ओसरल्याने संगमनेर तालुक्यातील पूरस्थिती नियंत्रणात! मध्यरात्री गाठली होती संगमनेरची नियंत्रण रेषा; संगमनेरकरांवर म्हाळुंगीचे उपकार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील 48 तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोटात तुफान जलवृष्टी झाल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. त्याचा परिणाम निळवंडे धरणाची पाणीपातळी वाढण्यात झाल्याने सोमवारी सायंकाळपासून निळवंडे धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले. मध्यरात्रीच्या सुमारास तर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग 30 हजार क्युसेक्सवर गेल्याने संगमनेर शहरासह तालुक्यातील नदीकाठावरील गावांना धोका निर्माण झाला होता. प्रशासनाने काही गावांतील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणीही हलवले होते. मात्र आज सकाळपासून पाणलोटातील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात खालावल्याने सद्यस्थितीत तालुक्यातील पूरस्थिती नियंत्रणात असून अद्यापपर्यत नुकसानीचा कोणताही तपशिल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे रात्रीपासून डोळ्यात तेल घालून नदीपात्राकडे डोळे लावून बसलेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
मोठ्या विश्रांतीनंतर मागील आठवड्यात पुनरागमन करणार्या वरुणराजाने जिल्ह्यात चैतन्याचे वातावरण निर्माण केले होते. मात्र मागील 48 तासांत मुळा व भंडारदरा धरणांच्या पाणलोटात पावसाने अक्षरशः थैमान घातल्याने या दोन्ही धरणांसह निळवंडे धरणातील पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात वाढून रविवारी (ता.12) भंडारदरा पूर्ण क्षमतेने भरले, तर सोमवारी निळवंडे धरणाचा पाणीसाठाही 93 टक्क्यांवर पोहोचल्याने सकाळी 11 वाजेपासून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सोमवारी सकाळी सहा वाजता भंडारदरा धरणातून 7 हजार 744 क्युसेक्स विसर्ग सुरु होता, मात्र निळवंडेची कवाडे बंद होती. त्यावेळी निळवंडेचा एकूण पाणीसाठा 7 हजार 486 दशलक्ष घनफूट (89.88 टक्के) झाला होता.
सकाळी 10 वाजेपर्यंत तो 93 टक्क्यांवर पोहोचल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून सुरुवातीला अवघे 685 क्युसेक्स व दुपारी दोनच्या सुमारास 3 हजार 360 क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली. या दरम्यान पाणलोटातील पावसाचा जोर आणखी वाढल्याने अवघ्या तासाभरातच निळवंडेचा दरवाजा आणखी वरती उचलण्यात आला व धरणातून 6 हजार 65 क्युसेक्स विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजता त्यात आणखी वाढ होवून निळवंडे धरणाचा एकूण विसर्ग 8 हजार 144 क्युसेक्सवर पोहोचला. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भंडारदरा धरणाच्या विसर्गात वाढ होवून तो 9 हजार 892 क्युसेक्स वेगाने करण्यात आला, त्यामुळे निळवंड्याचा विसर्गही 10 हजार 856 क्युसेक्स झाला. रात्री नऊ वाजता भंडारदर्याच्या विसर्गात आणखी वाढ होवून 12 हजार 104 क्युसेक्सने पाणी सोडले जावू लागले.
त्यामुळे निळवंडे धरण 95 टक्क्यांच्या आसपास पोहोचल्याने धरणाच्या सुरक्षिततेसाठी विसर्गात वाढ करण्यात येवून तब्बल 16 हजार 101 क्युसेक्स, रात्री पावणे अकराच्या सुमारास भंडारदरा 14 हजार 937 क्युसेक्स तर निळवंडे 20 हजार 611 क्युसेक्स, मध्यरात्री 12 वाजता निळवंडे 25 हजार 463 क्युसेक्स, साडेबारा वाजता भंडारदर्याचा विसर्ग आणखी वाढून 17 हजार 732 क्युसेक्स झाल्याने निळवंड्यातून 30 हजार 28 क्युसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात झाली आणि प्रशासनाची धावपळ वाढली. मात्र उत्तर नगर जिल्ह्याच्या सुदैवाने आज पहाटे दोन वाजेपासून पावसाचा वेग कमी होवून धरणातील पाण्याची आवकही खालावत गेल्याने पहाटे सहा वाजता भंडारदर्याचा विसर्ग 13 हजार 986 क्युसेक्सपर्यंत कमी करण्यात आला. त्यात टप्प्याटप्प्याने घट होवून आज दुपारी 04 वाजेपर्यंत तो 3 हजार 252 क्युसेक्सपर्यंत कमी करण्यात आला.
त्यामुळे निळवंडे धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात खालावल्याने सकाळी सात वाजता निळवंडे धरणातील विसर्ग 26 हजार 604 क्युसेक्सपर्यंत खाली आणण्यात आला. याचवेळी संगमनेर तालुक्यातील ओझर बंधार्यापर्यंत 11 हजार 285 क्युसेक्सचा प्रवाह पोहोचला होता. सकाळी 10 वाजता निळवंड्याचा विसर्ग आणखी कमी होवून 19 हजार 456 क्युसेक्स व दुपारी 12 वाजता 12 हजार 990 क्युसेक्सपर्यंत कमी झाल्याने रात्रीपासून हायअॅलर्ट असलेल्या प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सध्या संगमनेरच्या नदीपात्रातून 23 हजारांहून अधिक क्युसेक्सने पाणी वाहत असून ओझर बंधार्यावरुन जायकवाडीकडे 20 हजार 901 क्युसेक्स वेगाने पाणी धावत आहे.
सोमवारी मध्यरात्रीपर्यंत निळवंडे धरणाचा एकूण विसर्ग 30 हजारांहून अधिक क्युसेक्स झाल्याने संगमनेर तालुक्यातील नदीकाठावरील नागरिकांसह प्रशासनाची झोप उडाली होती. संगमनेर तालुक्याची पूर नियंत्रण रेषा निश्चित नसली तरीही यापूर्वी 2006 साली आलेल्या महापूराच्यावेळी 35 हजार क्युसेक्सच्या प्रवाहाने अनेकांच्या संसाराला गिळले होते. मात्र त्यावेळी म्हाळुंगी नदीही वाहती असल्याने त्याचा मोठा फटका बसला होता. यावेळी मात्र म्हाळुंगी अद्यापही कोरडीठाक असून 30 हजार क्युसेक्सचा प्रवाह वाहूनही तालुक्यात फार मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. खबरदारी म्हणून अगदीच नदीकाठावरील काही कुटुंबाना सोमवारीच सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते.