खासदारकी रद्द करुन भाजपने लोकशाहीचा खून केला ः थोरात भाजपविरोधात रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याचा दिला इशारा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. कर्नाटकमधील 2019 च्या एका सभेतील विधानाचा संदर्भ घेऊन खोटी तक्रार दाखल करत हा निर्णय घेतलेला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न भाजप मागील काही दिवसांपासून करत होते. हे सर्व जाणीवपूर्वक व ठरवून केलेले असून खासदारकी रद्द करण्याचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा निर्णय हा लोकशाहीचा खून आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे राहुल गांधी सुद्धा भाजपचा पराभव करून पंतप्रधान होतील, असा विश्वास काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचे समजताच त्याचे पडसाद विधीमंडळात उमटले. महाविकास आघाडीने या घटनेचा निषेध करत सभात्याग केला व विधानभवनच्या पायर्‍यावर काळ्या फिती लावून मोदी सरकारचा धिक्कार केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते अजय चौधरी, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यासह मविआचे आमदार उपस्थित होते.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार थोरात पुढे म्हणाले, मागील 9 वर्षांपासून केंद्रातील मोदी सरकार फक्त निरव मोदी, ललीत मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्यासारख्या भ्रष्ट लोकांसाठी काम करत आहेत. तर राहुल गांधी देश वाचविण्यासाठी लढत आहेत. देशातील जनतेचे करोडो रुपये घेऊन हे भ्रष्ट उद्योगपती देशाबाहेर पळाले. या भ्रष्टाचाराविरोधात राहुल गांधी यांनी सातत्याने आवाज उठवला. अदानी-मोदींच्या संबंधावर लोकसभेत जाब विचारला. केंब्रिज विद्यापीठातील विधानावर राहुल गांधी यांनी माफी मागवी म्हणून विरोधक मागणी करत होते. पण राहुल गांधी यांना लोकसभेत बोलूही दिले नाही.

इंग्रज राजवटीत सरकारविरोधात बोलल्यानंतर कठोर शिक्षा दिली जायची, तीच पद्धत भाजप सरकार आज वापरत आहे. राहुल गांधींचा चौकशीच्या नावाखाली आधी ईडीच्या कार्यालयात 10-10 तास छळ केला. शेवटी ते भाजपच्या दडपशाहीला भीक घालत नाहीत हे दिसल्याने त्यांची खासदारकी रद्द केली, याचा आम्ही निषेध करतो. भाजपा सरकार व मोदी सरकारचा धिक्कार करतो आणि आगामी काळात आम्ही भाजपविरोधात रस्त्यावर उतरुन आणखी तीव्र संघर्ष करु.

खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा लोकशाहीवरील हल्ला आहे. भारत जोडो यात्रेनंतर भारतीय जनता पक्ष राहुल गांधी यांना जास्तच घाबरू लागला आहे. लोकसभेत राहुल गांधी यांनी अदानी-मोदी संबंधाचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यातूनच भाजपने सुडबुद्धीने कारवाई केली आहे. एकूणच देशाची वाटचाल लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे चालली आहे याचा हा पुरावा आहे. स्व. इंदिरा गांधी यांनी अशाच प्रकारच्या व्यवस्थेचा सामना केला होता. आता राहुल गांधी सुद्धा त्याच व्यवस्थेचा सामना करत आहेत. पण या अत्याचारी व्यवस्थेला तोंड देत इंदिरा गांधी जनता पक्षाचा पराभव करत पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्या. राहुल गांधी सुद्धा भाजपचा पराभव करून देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

Visits: 68 Today: 1 Total: 437681

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *