नांदूर खंदरमाळच्या शेतकर्यांचा घारगाव महावितरण उपकेंद्रावर मोर्चा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे महावितरण अधिकार्यांचे शेतकर्यांना आश्वासन
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नांदूर खंदरमाळसह परिसरातील शेतकर्यांची पिके वीजेअभावी जळू लागली आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी शनिवारी (ता.19) दुपारी थेट घारगाव येथील महावितरण उपकेंद्रावर धडक दिली. यावेळी शेतकरी चांगलेच संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.
नांदूर खंदरमाळसह परिसरातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात कांदे, वाटाणा आदी पिके केलेली आहेत. ही पिके एक ते दोन पाण्यावर आली आहेत. मात्र वीज पुरवठा सुरळीत होत नसून वाफ्यात पाणी गेले की लगेच मागे विद्युत मोटार बंद होते. त्यामुळे पिके जळू लागली आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात काय करावे असा प्रश्न शेतकर्यांपुढे निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले असून, शनिवारी दुपारी सरपंच जयवंत सुपेकर, माजी सरपंच गणेश सुपेकर, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर सुपेकर, योगेश मोरे, भागाजी मोरे, संजय जाधव, सचिन मोरे, गुलाब जाधव, सयाजी मोरे, मोहन गाढवे, सुरेश मोरे, श्रीधर करंजेकर, भाऊसाहेब गाढवे आदी शेतकर्यांनी घारगाव महावितरण उपकेंद्रावर मोर्चा काढला.
यावेळी सहाय्यक अभियंता निखील शेलार यांच्याशी शेतकर्यांनी चर्चा केली. मात्र शेतकर्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले होते. मोर्चा आल्याची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, गणेश लोंढे, राजेंद्र लांघे, संतोष खैरे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस निरीक्षक पाटील यांनीही संतप्त शेतकर्यांशी चर्चा केली. त्यानंतर सहाय्यक अभियंता शेलार यांनी वरीष्ठ अधिकार्यांशी चर्चा करुन वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन शेतकर्यांना दिले. मग शेतकरी शांत झाले.
सध्या नांदूरसह खंदरमाळ परिसरात शेतकर्यांनी कांदा, वाटाणा आदी पिके केली आहेत. मात्र अशा पिकांना एकोणचाळीस ते चाळीस अंश सेल्सिअस तापमानामध्ये आठ-आठ दिवस पाणी देता येत नसेल तर ही पिके आज उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आम्ही संतप्त शेतकर्यांनी महावितरण उपकेंद्रावर मोर्चा आणत निवेदन दिले आहे. यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्या उपाययोजना त्वरीत केल्या नाहीतर भविष्यात यापेक्षाही मोठ्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल.
– गणेश सुपेकर (माजी उपसरपंच-नांदूर खंदरमाळ)