संगमनेर नगरपालिकेला मार्केट वसुलीसाठी ठेकेदारच मिळेना! अवाढव्य रकमेच्या वसुलीची चिंता; महिन्याभरात चारवेळा फेरलिलावाची नामुष्की..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील रस्त्यारस्त्यांवर भरणारे भाजीबाजार, त्यात फळे विक्रेत्यांची बेसुमार गर्दी आणि भरीतभर म्हणून फेरीविक्रेते व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दाटी यामुळे शहराची रया गेलेली असताना त्यात आता आणखी भर घालण्यासाठी पालिका पुढे सरसावली आहे. शहराचे व शहरातील नागरिकांचे काय व्हायचे ते होवू देत, पण आम्हाला भरपूर वसुली हवीच असे म्हणत पालिकेने एक-दोनदा नव्हेतर तब्बल पाच वेळा ‘जाहीर निविदा’ प्रसिद्ध करुन भल्या मोठ्या रकमेची वसुली करुन देणार्या ठेकेदाराचा शोध सुरु केला आहे. त्यासाठी गेल्या पाच आठवड्यांपासून सातत्याने लिलाव आणि फेरलिलाव जाहीर करण्यात आले आहेत. मात्र असे असतानाही पालिकेला अपेक्षित असलेली रक्कम ‘वसूल’ करुन देणारा अद्यापही गवसलेला नाही. त्यासाठी आज नव्याने पुन्हा एकदा निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आली असून येत्या सोमवारी फेरलिलावाची प्रक्रिया राबविली जाणार आहे.
गेल्या काही वर्षांत प्रचंड विस्तारलेल्या संगमनेरातील अंतर्गत रस्ते दूरदृष्टीच्या अभावाने मात्र आहे तितकेच राहिले. त्यातही अशा सगळ्याच रस्त्यांवर फळे व फेरीविक्रेते, विविध खाद्यपदार्थ, पेय यांच्या हातगाड्या आणि या गोष्टी कमी पडतात म्हणून अतिशय बेशिस्तपणे वाहने उभी करण्याची संगमनेरकरांची सवय यामुळे प्रगत शहर म्हणून घोडे नाचवणार्या संगमनेर शहराची अक्षरशः रया गेली आहे. त्यातच कोविड संक्रमणाच्या कालावधीत एकाच ठिकाणी गर्दी होवू नये यासाठी प्रशासनाने शहर व उपनगरातील अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात भाजीबाजार भरवण्यास परवानगी दिली होती. संक्रमणाचा कालावधी हटून वर्ष-दीड वर्ष लोटले असले तरीही तात्पूरते असलेले हे सगळे बाजार आता कायमस्वरुपी झाले आहेत. त्यातून शहरातील अनेक चौक, रस्ते आणि उपनगरांमध्ये गचाळपणा आणि बेशिस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
‘वैभवशाली’ म्हणविल्या जाणार्या बसस्थानकाच्या परिसरापासून ते अगदी सह्याद्री महाविद्यालयापर्यंत आणि म्हाळुंगी नदीच्या पुलापासून ते थेट ज्ञानमाता विद्यालयापर्यंत शहरातील एकही भाग असा नाही ज्या भागात यासर्व घटकांची प्रचंड दाटी, वाहनांची गर्दी आणि त्यातून मार्ग गवसणारा सर्वसामान्य संगमनेरकर असेच चित्र पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून ते जुन्या कटारिया कॉर्नरपर्यंचा रस्ता असो किंवा अकोले नाक्यापासून तीनबत्ती चौकापर्यंत कोल्हार-घोटी राज्य मार्ग म्हणून परिचयाचा असलेला महामार्ग असो अतिक्रमण धारकांच्या तावडीतून अशी एकही जागा सुटलेली नाही. या सर्व गोष्टींना आणि त्यापासून होणार्या त्रासाला वैतागून अनेकदा नागरिकांनी आपला रोषही व्यक्त केला आणि माध्यमांनी आवाजही उठवला. पण त्यामागे पालिकेचे अर्थकारण असल्याने नागरिकांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही.
त्याचा प्रत्यय आता येत असून गेल्या पाच आठवड्यांपासून गावभरातील चौक आणि गल्लीबोळात दुकाने, पथार्या आणि हातगाड्या थाटून बसलेल्यांकडून विक्रमी वसुली करुन देणार्याचा पालिका शोध घेत आहे. त्यासाठी गेल्या महिन्याच्या 28 तारखेला पहिल्यांदा लिलाव घेण्यात आले होते. मात्र पालिकेला अपेक्षीत असलेली रक्कम आवाक्याबाहेर वाटल्याने कोणीही वसुलीचा ठेका घेण्याची हिंमत दाखवली नाही. त्यामुळे पालिकेने त्यानंतरच्या कालावधीत 10, 16 व 23 मार्च रोजी पुन्हा जाहीर निविदा प्रसिद्ध करुन ठेकेदार शोधण्याचा प्रयत्न केला. 10 मार्चचा लिलाव काही कारणास्तव स्थगित केला गेला, मात्र उर्वरीत दोन्ही तारखांना लिलावाची प्रक्रिया राबवूनही पालिकेला हवी तितकी रक्कम गोळा करुन देणारा भेटला नाही.
त्यामुळे पालिकेने आता चौथ्यांदा मार्केट वसुली करण्यासाठी निविदा जाहीर केली आहे. त्यानुसार येत्या सोमवारी (ता.27) पुन्हा एकदा लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे. सन 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी पालिकेने बाजार वसुलीचा ठेका 75 लाख 51 हजार रुपयांना दिला होता. आता पुढील सन 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी पालिकेला मार्केट वसुलीमधून किमान 85 लाख रुपयांची अपेक्षा आहे. त्यासाठी गेल्या 27 फेब्रुवारीपासून चारवेळा लिलाव घोषित करुन तीनवेळा प्रत्यक्ष प्रक्रियाही राबविली गेली, मात्र इतकी मोठी रक्कम गोळा करण्याचा विडा अजून कोणीच उचललेला नाही, त्यामुळे एकाच गोष्टीसाठी तब्बल पाचव्यांदा वृत्तपत्रात निविादा सूचना प्रसिद्ध करण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली आहे.
आजच्या स्थितीत शहरात असलेले भाजीबाजार, फळे, खाद्यपदार्थ व फेरीविक्रेते व अन्य व्यावसायिक यांच्याकडून होणार्या वसुलीची रक्कम मोठी आहे. त्यात वाढ करायची ठरल्यास वरीलप्रमाणे रस्त्यावरच पथार्या मारणार्या विक्रेत्यांची संख्या वाढवावी लागणार आहे. सध्या असलेल्या फेरीविक्रेते व भाजीविक्रेत्यांमुळे आधीच संगमनेरकरांना जीव मुठीत घेवून शहरातून फिरावे लागत असताना आता पालिकेला अधिक रक्कम हवी असल्याने त्यात वाढ होण्याची आणि वसुली ठेकेदाराकडून मनमानी होण्याची दाट शक्यता आहे. या सर्व घडामोडींवरुन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत पालिका किती गंभीर आहे याचे स्पष्ट दर्शनच घडले आहे.