संगमनेरातील गांजा तस्करीच्या गुन्ह्याची व्याप्ती वाढली..! शहरातील मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीसह अन्य तिघांची नावेही आली चौकशीतून समोर


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहर पोलिसांच्या छाप्यात मालदाड रोडवरील नव्याने सुरु झालेला ‘गांजा’ तस्करीचा अड्डा उध्वस्त झाल्यानंतर आता त्याच्या तपासातून या धंद्याची व्याप्ती उलगडू लागली आहे. पोलीस कोठडीतील चौकशीतून या गोरख धंद्यात संगमनेर शहरातील अगदी मध्यवस्तीत राहणार्‍या आणखी एकासह तळेगाव दिघे व गुजरात येथील इसमांचाही समावेश असून तेलंगणामधील एक आरोपी या संपूर्ण साखळीच्या केंद्रस्थानी आला आहे. गांजा तस्करीत नव्याने नाव आलेल्या संगमनेरातील संशयितावर यापूर्वी धुळ्यातील हत्याकांडात सहभागाच्या आरोपावरुन मोक्कान्वये कारवाई झालेली आहे. आता संगमनेरच्या गांजा कनेक्शनमध्येही त्याचे नाव समोर आल्याने त्याला अटक करण्यासाठी शहर पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.


गेल्या महिन्यात 20 सप्टेंबररोजी संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक रोशन पंडित यांनी शंकर टाऊनशीप, मालदाड रोड येथे छापा घालून 77 किलो सुक्या गांजासह तब्बल दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. या प्रकरणी मूळच्या कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे राहणार्‍या जययोगेश्‍वर दत्तु गायकवाड (वय 24) या मुख्य सूत्रधारासह विशाल निवृत्ती आरणे (वय 26) व खांडगाव येथील दीपक सुरेश तुपसुंदर (वय 34) या त्याच्या दोघा साथीदारांना अटक केली होती. पोलिसांनी केलेल्या या कारवाईने कासारवाडी वगळता शहरात अन्यत्रही गांजा तस्करीचा अड्डा असल्याचे त्यावेळी पहिल्यांदाच समोर आले होते. त्यामुळे पोलीस तपासाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झाले होते.


या तिनही आरोपींच्या कोठडीतील चौकशीतून मालदाड रोडवरील गांजा तस्करीचे केंद्र जययोगेश्‍वर गायकवाड चालवित असल्याचे समोर आले. त्यासोबतच संगमनेर शहरातील वाल्मीक चौक परिसरात राहणारा लखन जेधे या आरोपीचेही नाव समोर आले असून सदरचा संशयित गांजा तस्करीत गायकवाडचा पन्नास टक्क्यांचा वाटेकरी असल्याची माहिती हाती लागली आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी धुळ्यात भररस्त्यात झालेल्या हत्याकांडातील आरोपींना संगमनेरात आश्रय दिल्याच्या कारणावरुन धुळे पोलिसांनी त्याला सहआरोपी म्हणून अटक केली होती व त्यानंतर त्याच्यावर मोक्कान्वयेही कारवाई झाली होती. सध्या तो जामीनावर बाहेर आहे. मात्र शंकर टाऊनशीपमधील अड्ड्यावर छापा पडल्यापासून तो पसार झाला आहे.


त्यासोबतच तळेगाव दिघे येथील जगताप नामक व गुजरातमधील अन्य एका व्यक्तिचेही नाव या प्रकरणात समोर आले आहे. गायकवाड हा या धंद्याचा स्थानिक सूत्रधार असून तेलंगणामधील शंकर नामक व्यक्तिकडून तो गांजा घेवून येत होता अशी माहितीही तपासातून समोर आली आहे. शहर पोलीस सध्या स्थानिक असलेल्या लखन जेधेसह तळेगावमधील जगताप, गुजरातमधील अनोळखी इसम आणि तेलंगणामधील शंकरला अटक करण्याच्या तयारीत आहेत. मात्र संबंधितांनी त्यांची ठिकाणे बदलल्याने ते अद्यापही पोलिसांपासून दूर आहेत.


20 सप्टेंबररोजी मालदाड रोडवरील छाप्यात पकडण्यात आलेला गांजा तस्करीतील मुख्य सूत्रधार जययोगेश्‍वर गायकवाड हा पूर्वी कासारवाडीतील ‘त्या’ गांजा तस्कर महिलेच्या वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. त्यातूनच त्याने संपूर्ण ‘लाईन’ आत्मसात केली आणि स्वतःचाच धंदा निर्माण केल्याचे वास्तवही त्याच्या कोठडीतून समोर आले आहे. सदर इसमाच्या नाजूक संबंधाबाबतही अनेक गोष्टींवरील पडदे बाजूला सरकले आहेत. कासारवाडीच्या मुख्य केंद्रातूनच मालदाड रोडवरील केंद्राचा उदय झाल्याचे समोर आल्याने कासारवाडीतील व्यवसाय मग कोणाच्या आशीवार्दाने फुलला असा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. मालदाड रोडवरील गांजा तस्करीचा अड्डा उध्वस्त झाला खरा, मग कासारवाडीचा अड्डा कधी उध्वस्त होणार असा सवालही यातून निर्माण झाला आहे. त्यामुळे या तिनही आरोपींच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीवर शहर पोलीस किती गांभिर्याने तपास करतात याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


तीन वर्षांपूर्वी नगर पोलिसांनी कासारवाडीतील ‘त्या’ महिला गांजा तस्कराला नगरमध्ये जेरबंद केले होते. तिच्या चौकशीतूनही तेलंगणातील ‘शंकर’चे नाव पुढे आले होते. मात्र गेल्या तिन वर्षात नगर पोलिसांनाही तेलंगणाकडे जाणारा रस्ता सापडला नाही, तो आता सापडेल का? तेव्हा कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या व सध्या कोपरगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक असलेल्या राकेश मानगावकर यांना याच प्रकरणात लागेबांधे असल्याच्या कारणावरुन निलंबितही करण्यात आले होते. मात्र काळाबरोबरच त्या प्रकरणाचा तपास मागे पडला आहे असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे सदर प्रकरणात कासारवाडीतील गांजा तस्करांचे नाव समोर आलेले नाही. मात्र आज पहाटे पुणे पोलिसांनी कासारवाडीत छापा घालून ‘त्या’ गांजा तस्कर महिलेच्या कुटुंबातील एकाला सोबत नेल्याने संगमनेरातील अवैध व्यावसायिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Visits: 16 Today: 1 Total: 117838

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *