मुलाच्या वाढदिवशीच वडिलांचा मृत्यू विमानतळाजवळ अपघात; संगमनेरात शोककळा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कामकाजासाठी कोपरगावला गेलेला पिता आपल्या मुलाच्या वाढदिवसासाठी घाईगडबडीत दुचाकीवरुन परतत असताना झालेल्या भयंकर अपघातात त्यांचा जागीच जीव गेला. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास काकडी विमानतळाच्या परिसरात घडली. या दुर्दैवी घटनेत चंद्रशेखर चौकात राहणार्या नितीन उर्फ सोनु विश्वास पाटील (वय 48) यांचा वाहनाखाली चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. ऐन मुलाच्या वाढदिवशी झालेल्या या अपघातात वडिलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पूर्वी चंद्रशेखर चौकातील पाटीलवाड्यात राहणारे आणि गेल्या वर्षांपासून घासबाजारात मुक्कामी असलेले नितीन उर्फ सोनु पाटील एका खासगी फायनान्स कंपनीत सेवेत होते. नेहमीप्रमाणे गुरुवारी (ता.26) सकाळी ते आपल्या दुचाकीवरुन कंपनीच्या कामकाजासाठी कोपरगावला गेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत तेथील कामकाज पूर्ण झाल्यानंतर आठच्या सुमारास ते संगमनेरच्या दिशेने येण्यास निघाले. रात्री नऊच्या दरम्यान त्यांची दुचाकी शिर्डी विमानतळ ओलांडून पुढे आले असता पाठीमागून आलेल्या वाहनाची धडक बसून ते रस्त्यावरच पडले आणि दुर्दैवाने त्याच भरधाव वेगातील चारचाकी वाहनाखाली चिरडले गेले, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सोनु पाटील यांच्या 13 वर्षीय मुलाचा गुरुवारी वाढदिवस होता. आपला वाढदिवस वडिलांसोबतच साजरा व्हावा हा त्यांच्या मुलाचा हट्ट होता. मात्र कामकाज आटोपताना काहीसा उशिर झाल्याने मुलाची नाराजी नको म्हणून ते घाईगडबडीत संगमनेरच्या दिशेने निघाले होते. मात्र त्यांचे संगमनेरला पोहोचणे कदाचित काळाला मान्य नसल्याने त्याने त्यांना रस्त्यातच गाठले आणि मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापूर्वीच त्यांच्यावर झडप घातली.
या घटनेत मृत्यू झालेले नितीन उर्फ सोनु विश्वास पाटील (वय 48) अतिशय धाडशी स्वभावाचे होते. शहरात त्यांनी आपला मोठा मित्रवर्गही जमवला होता. त्यांच्या अपघाताची वार्ता समजताच त्यांच्या मित्रांनी रात्रीच घटनास्थळाकडे धाव घेतली, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व सासु-सासरे असा परिवार असून त्यांचा भाऊ नाशिक येथे वास्तव्यास आहे. सोनु पाटील यांच्या अपघाती मृत्यूने शहरातून शोक व्यक्त केला जात आहे.