पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचार्यांचा तहसीलमध्ये ‘गोंधळ’! माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पाठींबा; कर्मचार्यांची मोठी उपस्थिती..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘एकच मिशन – जुनी पेन्शन’ असा नारा देत आज सलग पाचव्या दिवशीही विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शासकीय व खासगी शाळा, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी आपले आंदोलन कायम ठेवले आहे. जो पर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही, तो पर्यंत माघार घेणार नसल्याचा एल्गार पुकारीत या सर्वांनी आज संगमनेरच्या तहसील कार्यालयाच्या परिसरात जागरण गोंधळ घातला. या दरम्यान माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी आंदोलनस्थळी येवून कर्मचार्यांना आपला पाठींबाही जाहीर केला.
गेल्या पाच दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सरकारी कर्मचार्यांच्या आंदोलनात आज जागरण गोंधळाचा अभिनव प्रयोग करण्यात आला. यावेळी मोर्चाने तहसील कार्यालयाच्या आवारात पोहोचलेल्या विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषदेचे कर्मचारी, प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांसह महाविद्यालयांचे प्राध्यापक व कर्मचारीही सहभागी झाले होते. यावेळी या सर्वांनी ‘एकच मिशन – जुनी पेन्शन’ असा घोष करीत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
कर्मचार्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी काँग्रेसचे नेते, माजीमंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे आंदोलनस्थळी पोहोचले तेव्हा आंदोलकांचा उत्साह दुणावला. यावेळी बोलतांना थोरात यांनी राजस्थान, छत्तीसगड व हिमाचल प्रदेश सरकारांनी कर्मचार्यांच्या मागण्या मान्य करीत जुनी पेन्शन योजना सुरु केल्याचे सांगत या तिनही राज्यात काँग्रेसची सरकारे असल्याकडे आंदोलकांचे लक्ष्य वेधले. 2027 साली भारत शंभर लाख कोटी रुपयांची आर्थिक महासत्ता होणार असतांना कर्मचार्यांना वार्यावर सोडण्याची सरकारची कृती असमर्थनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरात सातत्याने कर्मचार्यांच्या निवृत्ती वेतनाचा प्रश्न राज्यात गाजत असल्याचे सांगत थोरात यांनी निवृत्तीनंतरचे जीवन शाश्वत आणि सुखदायक होण्यासाठी निवृत्ती वेतनाची गरज असते. या विषयावर आपण विधानसभेतही आवाज उठविल्याचेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. देशात जेथे काँग्रेसचे सरकार आहे तेथील सरकारांनी यापूर्वीच कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे, मग भाजपाशासीत राज्यांमध्येच त्याला विरोध का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी आंदोलकांनी पुन्हा एकदा ‘पेन्शन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या …’ अशा जोरदार घोषणा दिल्या.