हळदीच्या कार्यक्रमाला निघालेल्या तिघांना काळाने माघारी बोलावले! चिखलीच्या तिघा तरुणांवर काळाचा घाला; सामान्य कुटुंबांवर आभाळ कोसळले..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शुक्रवारी रात्री मंगळापूर शिवारातील बर्फ कारखान्याजवळ प्रभात दूध डेअरीकडे निघालेल्या टँकरने समोरुन येणार्या दोन मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने तिघांचा बळी गेला, तर एकजण गंभीर झाला. मन सुन्न करणार्या या घटनेत जीव गमावलेले तिघेही तरुण सामान्य कुटुंबातील असून त्यातील ऋषीकेश हासे या तरुणाने शुक्रवारी बारावीचा शेवटचा पेपर दिला होता, तो एकुलता एक आहे. ओळखीतल्या एकाच्या हळदी समारंभासाठी समनापूरकडे निघालेल्या या तिघाही तरुणांनी संगमनेरातूनच माघारी फिरण्याचा निर्णय घेतला आणि घरी पोहोचण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या घटनेने अवघा तालुका शोकमग्न झाला असून तिघाही तरुणांवर आज दुपारी बाराच्या सुमारास चिखलीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
शुक्रवारी (ता.17) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चिखलीतील ऋषीकेश उमाजी हासे (वय 20), सुयोग बाळासाहेब हासे (वय 20), नीलेश बाळासाहेब सिनारे (वय 26) व संदीप भाऊसाहेब केरे (वय 32) हे चौघे दोन मोटार सायकलवरुन समनापूर शिवारातील विघ्नहर्ता लॉन्स येथे ओळखीतील एकाच्या हळदी समारंभासाठी निघाले होते. संगमनेरातील अकोलेनाका परिसरात आल्यानंतर गावातीलच एकाच्या दुकानावर जावून काहीवेळ घालवल्यावर त्यांनी अचानक हळदीच्या कार्यक्रमाला जाण्याचा बेत रद्द केला आणि अकोले नाक्यावरुनच माघारी घराकडे जाण्याचा निर्णय घेतला.
रात्री सव्वाआठच्या सुमारास हे तिघेही मित्र रस्त्याने गप्पा मारीत दोन दुचाकीवरुन साधारण वेगाने चिखलीकडे निघाले. त्यांची वाहने मंगळापूर शिवारातील इंद्रप्रस्थ लॉन्सच्या परिसरातील वळणावर आली असता समोरुन भरधाव वेगाने आलेल्या प्रभात दुध डेअरीच्या टँकरने (क्र.एम.एच.17/बी.वाय.3254) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत या तरुणांच्या दुचाक्यांना समोरासमोर जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात तिघाही तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर संदीप केरे हा तरुण दुचाकीवरुन रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. समोरासमोर झालेल्या धडकेतून मोठा आवाज झाल्याने आसपासच्या नागरिकांनी लागलीच घटनास्थळाकडे धाव घेतली.
माणसांचा जमाव येत असल्याचे पाहून अज्ञात टँकरचालक अंधाराचा फायदा घेत टँकर तेथेच सोडून पसार झाला. या घटनेची माहिती शहर पोलिसांना समजताच पोलिसांचे पथकही अपघातस्थळी दाखल झाले. बर्फ कारखान्याच्या परिसरात राहणार्या नागरिकांनी तत्काळ मदत करीत जखमी असलेल्या चौघांनाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच ऋषीकेश उमाजी हासे (वय 20), सुयोग बाळासाहेब हासे (वय 20) व नीलेश बाळासाहेब सिनारे (वय 26) या तिघांना काळाने ओढून नेले होते. या अपघातात सुदैवाने बचावलेल्या संदीप भाऊसाहेब केरे (वय 32) याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघेही तरुण अतिशय सामान्य कुटुंबातील आहेत. त्यातील ऋषीकेश उमाजी हासे हा तरुण एकुलता एक असून त्याला एक छोटी बहीण आहे. चिखली बसथांब्यावरील छोटेखानी चहाचे दुकान चालवून त्याचे वडील आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. शुक्रवारी ऋषीकेशने बारावीचा शेवटचा पेपर दिला होता. त्याच्याच वयाच्या सुयोग बाळासाहेब हासे याने मॅकेनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला असून तो खासगी क्षेत्रात सेवेत होता. त्याचे वडील सायकल पंक्चरचे दुकान चालवतात. त्याला एक लहान भाऊ आहे. तर नीलेश बाळासाहेब सिनारे हा 26 वर्षीय तरुण शेतकरी कुटुंबातील असून पोलीस भरतीची तयारी करीत होता. त्याला एक मोठा भाऊ आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तिघांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेला टँकर ताब्यात घेतला आहे. या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून पोलीस दप्तरी नोंद झाली असून मयत तरुणांच्या कुटुंबातील सदस्यांच्या फिर्यादीवरुन टँकर चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. घटनेनंतर टँकरचालक पसार झाला असून अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. आज (ता.18) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चिखलीतील या तिघाही तरुणांवर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मयतांच्या कुटुंबासह त्यांच्या मित्रांना आणि गावकर्यांना शोक अनावर झाला होता. चिखलीकरांनी सकाळच्या सत्रात व्यवहार बंद ठेवून या तरुणांना श्रद्धांजली वाहिली.
मित्राच्या घरी मंगलकार्य असल्याने शुक्रवारच्या हळदी समारंभासाठी उपस्थित रहाण्यासाठी हे चौघेही चिखलीतून समनापूरकडे निघाले होते. जाताना संगमनेरात असलेल्या चिखलीतील एकाच्या दुकानावर जावून त्यांनी गप्पाही मारल्या. तेथून ते विघ्नहर्ता लॉन्स येथे जाणार होते, मात्र काळाला ते मान्य नसल्याने अचानक त्यांचा विचार बदलला आणि ते चौघेही संगमनेरातूनच माघारी वळले आणि त्यानंतर काही मिनिटांतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. चिखलीतील धडपडे तरुण म्हणून त्यांची ओळख होती, विविध सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग ठळकपणे दिसून यायचा. त्यातूनच त्यांनी मित्रमंडळींचा मोठा संच उभा केला होता, मात्र या अपघाताने ते सगळं संपविलं आहे.