घारगावच्या उपसरपंचपदी गाडेकर
घारगावच्या उपसरपंचपदी गाडेकर
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मनीषा नवनाथ गाडेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या सभागृहात मंगळवारी (ता.13) दुपारी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून पार पडली.

अध्यादेशीय अधिकारी सरपंच अर्चना आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. तर सचिव म्हणून ग्रामसेवक अशोक बलसाने यांनी काम पाहिले. उपसरपंच पदासाठी मनीषा गाडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना नूतन उपसरपंच गाडेकर म्हणाल्या, शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर, सामाजिक कार्यकर्ते नितीन आहेर व सरपंच अर्चना आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली खर्या अर्थाने मला आज उपसरपंचपदाची जी संधी मिळाली, त्यामुळे मी भारावून गेली आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच एकोप्याने काम करत आलो आहे. भविष्यातही सरपंच आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा रथ पुढे चालूच ठेवू असा निर्धार व्यक्त केला. सरपंच अर्चना आहेर म्हणाल्या, आज मनीषा गाडेकर या उपसरपंच झाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही महिला सरपंच व उपसरपंच असल्याने महिलांच्या ज्या अडीअडचणी असतील त्या सर्व सोडवण्यास प्रथम प्राधान्य देऊ. सध्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावासह वाड्या-वस्त्यांवर विविध विकास कामे झाली असून काही ठिकाणी कामे सुरूही आहेत. जेवढी विकास कामे करता येतील ती सर्व कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नक्कीच आम्ही करणार आहोत. त्यामुळे भविष्यात घारगाव हे विकास कामांचे ‘मॉडेल’ झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही शेवटी त्यांनी व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.

