पोलिसांच्या मध्यस्थीने चैतन्यपूर फाटा ते बदगी रस्त्याचा प्रश्न निकाली

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील चैतन्यपूर गावामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चैतन्यपूर फाटा ते बदगी या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु, या कामातील अडथळे लोकशाही मार्गाचा वापर करून दूर केले गेले तरीही काही शेतकर्‍यांनी त्यांच्या जमीन हद्दीच्या वादातून रस्त्याचे काम वारंवार स्थगित करत आहे. याची सहा. पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांनी दखल घेत स्वतः उपस्थित राहून प्रश्न निकाली काढला आहे.

भक्ताचीवाडी येथील प्रकाश विठोबा गवांदे व पार्वताबाई हुलवळे यांच्यातील जमिनीच्या वादामुळे अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या कामात अडथळे येत होते. सदर प्रकार आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याकडे गेल्याने त्यांनी तत्काळ प्रभारी पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांना समस्या सोडविण्याबाबत सूचना केल्या. त्यानंतर सहा. पोलीस निरीक्षक घुगे यांनी विलंब न करता प्रत्यक्ष उपस्थित राहून अनेक दिवसांचा रखडलेला प्रश्न निकाली काढला. यावेळी सरपंच नितीन डुंबरे, उपसरपंच महेश गवांदे, सदस्य राहुल हुलवळे, इंजि. नवले, प्रा. मयूर गवांदे, बाळासाहेब गवांदे, खंडू हुलवळे, वसंत मुळे, योगेश गवांदे, फत्तेसिंग आहेर, निवृत्ती गवांदे, नामदेव गवांदे, अण्णाजी गवांदे, खंडू नरवडे, सुधीर नरवडे, ग्रामविकास अधिकारी निवृत्ती कोकतरे व ग्रामपंचायत कर्मचारी बबन भोर उपस्थित होते.

Visits: 10 Today: 2 Total: 79541

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *