शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचा मोर्चा नाशिक येथून असंख्य शेतकर्यांच्या सहभागाने मुंबईच्या दिशेने रवाना
नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या काही दिवसांपासून शेतकरी सतत संकटात सापडत आहे. मात्र, सरकारचे शेतकर्यांकडे दुर्लक्ष होत आहे. याबरोबरच इतर मागण्यांकडेही लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेने मोर्चाची हाक दिली असून, नाशिक येथून रविवारी (ता.12) सायंकाळी असंख्य शेतकर्यांनी नारा देत मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. यामध्ये अकोलेसह इतर तालुक्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी आहेत.
कांद्याला 600 रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे, किमान दोन हजार रुपये दराने कांद्याची नाफेडमार्फत खरेदी करावी, कसणार्यांच्या ताब्यात असलेली 4 हेक्टरपर्यंतची वनजमीन कसणार्यांच्या नावे करावी, शेतकर्यांना दिवसा सलग 12 तास वीज उपलब्ध करून थकीत वीजबिले माफ करावी, शेतकर्यांचे शेती विषयक संपूर्ण कर्ज माफ करून 7/12 कोरा करावा, अवकाळी पावसाने व वर्षभर सुरू असलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीची एनडीआरएफमधून तत्काळ भरपाई द्यावी, पीकविमा कंपन्यांच्या लुटमारीला लगाम लावून पीकविमा धारकांना नुकसानीची भरपाई देण्यास कंपन्यांना भाग पाडावे, बाळहिरडा पिकाला प्रतिकिलो किमान 250 रुपये हमीभाव देऊन हिरड्याची सरकारी खरेदी योजना सुरू ठेवावी, दूध तपासणीसाठी वापरण्यात येणार्या मिल्कोमीटर व वजन काट्यांची नियमित तपासणी करण्याची स्वतंत्र यंत्रणा उभारावी, गायीच्या दुधाला किमान 47 आणि म्हशीच्या दुधाला किमान 67 रुपये भाव द्यावा.
याबरोबरच 2005 नंतर भरती झालेल्या शासकीय कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, तसेच समाज कल्याण विभागातील कर्मचार्यांना वेतन श्रेणी लागू करावी, अंशत: अनुदानित शाळांना 100 टक्के अनुदान मंजूर करावे,सध्याच्या महागाईचा विचार करता गरीब शेतकरी, शेतमजूर, कामगार, झोपडपट्टीत राहणार्या गरिबांना मिळणार्या प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान 1 लाख 40 हजारांवरुन 5 लाख रुपये करावे व वंचित गरीब लाभार्थ्याचा नवीन सर्वे करून त्यांची नावे ‘ड’ यादीत समाविष्ट करावी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशासेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर, ग्रामरोजगार सेवक, पोलीस पाटील अशा जनतेशी निगडीत असणार्या कर्मचार्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करून त्यांना शासकीय वेतन श्रेणी लागू करावी, आदी मागण्या करण्यात आल्या असल्याचे डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, उमेश देशमुख व डॉ. अजित नवले यांनी सांगितले.