काँग्रेसचे नगरसेवक ‘नाना’ संगमनेर भाजपाच्या ‘गळाला’? संगमनेरात ऑपरेशन लोटसचा संशय; समाज माध्यमातील ‘ते’ छायाचित्र चर्चेत..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून ‘बळ’ प्राप्त झालेल्या संगमनेर भाजपाने राजकीय कुरघोड्या करण्यास सुरुवात केली आहे. आगामी कालावधीत होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून घडत असलेल्या या विविध घटनांमधून असाच प्रकार असल्याची चर्चा सुरु असतानाच आता चक्क काँग्रेसच्या एका विद्यमान नगरसेवकाचे भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांसोबतचे एकत्रित छायाचित्र समाज माध्यमातून व्हायरल झाल्याने या चर्चेला वास्तवाचे कोंदणही प्राप्त झाले आहे. त्यावरुन व्हाया लोणी संगमनेरात ‘ऑपरेशन लोटस’ तर राबविले जात नाही ना? असाही संशय निर्माण झाला असून संगमनेर काँग्रेसचे नगरसेवक ‘नाना’ भाजपाच्या ‘गळाला’ लागल्याची जोरदार चर्चा शहरात सुरु आहे.

संगमनेर भाजपाचे शहराध्यक्ष अ‍ॅड.श्रीराम गणपुले व सरचिटणीस जावेद जहागिरदार या दोघांचेही शहरातील सर्वपक्षीय राजकारण्यांशी मैत्रीचे संबंध आहेत. शहराची राजकीय संस्कृतीही त्याच पद्धतीची असल्याने निवडणुकांच्या कालावधीत एकमेकांच्या विरोधात उभे राहून शड्डू ठोकणारे स्थानिक नेते व कार्यकर्ते त्यानंतर पुन्हा एकत्रित वावरताना दिसतात. त्यातच जावेद जहागिरदार पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे कार्यकर्ते असून स्थानिक स्वराज्य संस्थांचे कायदे व नियम यावर त्यांचा अभ्यास असल्याने पालिका वर्तुळात कार्यरत असलेले अनेकजण नेहमीच त्यांच्या संपर्कात असतात. मात्र सध्या समाज माध्यमात ‘व्हायरल’ होत असलेली ‘ती’ छायाचित्रे जाणीवपूर्वक प्रसारित केल्याचा संशय असल्याने त्यातून सत्ताधारी कंपूत चलबिचल करण्याचाही प्रयत्न असण्याची शक्यता आहे.

सन 2016 सालच्या पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 (अ) मधून गजेंद्र उर्फ गजानन (नाना) अभंग काँग्रेसच्या चिन्हावर 1 हजार 321 मते मिळवून निवडून आले होते. त्यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे सोमनाथ कानकाटे (962 मते) यांचा 359 मतांनी पराभव केला होता. ही निवडणूक शिवसेना आणि भाजपाने स्वतंत्रपणे लढविल्याने भाजपाकडून लढणार्‍या मनोज जुंदरे यांना अवघी 176 मते मिळाली होती. तर याच प्रभागातील महिलांसाठी राखीव असलेल्या दुसर्‍या जागेवर काँग्रेसच्या मनीषा भळगट यांनी 1 हजार 211 मते मिळवताना शिवसेनेच्या वनीता गाडे (1143 मते) यांचा अवघ्या 68 मतांनी पराभव केला होता. त्यावरुन या प्रभागात काँग्रेसनंतर शिवसेनेला मतदान करणारा मोठा वर्ग असल्याचेही समोर आले होते.

गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत शिवसेना व भाजपा यांच्यातील मतभेदाची दरी अधिक रुंदावत गेल्याने आणि आतातर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षालाच सुरुंग लावल्याने संपूर्ण राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. राज्यातील शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले असून शिंदेगट भाजपासोबत राज्यातील सत्तेत विराजमान झाला आहे. स्थानिक पातळीवरही या पक्षाचे कार्यकर्ते दोन गटात विभागले गेल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेतील या फुटीमुळे एकीकडे कार्यकर्त्यांचे विभाजन झाले असले तरीही शिवसेनेला मानणारा मतदार वर्ग नेमका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाणार की बाळासाहेबांच्या याबाबत अद्याप कोणीही अंदाज बांधू शकलेला नाही. त्यामुळे भाजपाने विजयी उमेदवारांनाच गळाला लावण्याचा प्रयत्न तर सुरु केला नाही ना? अशीही शंका निर्माण झाली आहे.

शिवसेनेतील फुटीचा राजकीय फायदा मिळवून शहरी भागासह ग्रामीण भागातही भाजपाचे प्राबल्य वाढावे यासाठी राज्य भाजपाकडून स्थानिक नेत्यांना बळ देण्याचे प्रयोग सुरु असून नगरजिल्ह्यातही असेच प्रयोग सुरु आहेत. त्यातूनच एकीकडे सत्ताधारी गटातील कार्यकर्त्यांच्या मनोबलावर हल्ला चढवून तर दुसरीकडे प्रेमाने गळ्यात हात घालून कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या चार महिन्यांपासून संगमनेरातील वाळू व स्टोनक्रशरवरील कारवाई हे सांगण्यास पुरेशी आहे. संगमनेरच्या महसूल विभागाने तालुक्यातील स्टोनक्रशर चालकांवर उगारलेला तब्बल 765 कोटी रुपये दंडाच्या कारवाईचा बडगा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घाबरवणारा असून त्यातून ‘ऑपरेशन लोटस’ राबविण्याची भाजपाची योजना नाही ना? असा संशय निर्माण झाला आहे.

गजेंद्र अभंग उर्फ नाना यांना मानणारा मोठा वर्ग संगमनेरात आहे. दशकापूर्वीच्या (सन 2011) पालिका निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी देण्यास नकार दिल्यानंतर ते अपक्ष लढले होते व त्यांनी विजयही संपादन केला होता. त्यामुळे त्यांच्या प्रभागात काँग्रेसचा मतदार दिसत असला तरी तो त्यांनाच मानणारा असल्याचेही स्पष्ट झाले होते. त्यामुळे काँग्रेसचे हेच ‘नाना’ गळाला लागले तर वाढीव प्रभागरचना रद्द झाल्यास दोन नगरसेवकांची भर पडण्यासह नानांना मानणारा त्यांचा समाजही आपल्याकडे खेचला जाईल या विचारातून स्थानिक भाजपाकडून पूर्वाश्रमीच्या संबंधांना उजाळा देवून त्यांना खेचण्याचे काम सुरु झाल्याचे जहागिरदार यांनी शेअर केलेल्या छायाचित्रातून दिसत आहे. या छायाचित्राने वेगवेगळ्या कारणांनी लांबलेल्या पालिका निवडणुकीचे वारे पुन्हा वाहतेही केले आहेत.


जनाधार सोबत असतानाही काँग्रेसमधील काही विद्यमान नगरसेवकांचा यंदाच्या निवडणुकीत पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या मोठ्या कालावधीपासून गजेंद्र अभंग यांच्याकडेही पक्षाकडून दुर्लक्ष केले जात असून अडचणीच्या वेळी पक्षातील कोणताही घटक आपल्यासोबत नसल्याची खंतही त्यांच्या मनात आहे. याच पडक्या बाजूला हवा देत भाजपाकडून त्यांना चुचकारले जात असल्याची माहिती असून त्यातून ते काय निर्णय घेतात याकडे त्यांच्या प्रभागासह शहराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *