संगमनेरमध्ये सामूदायिक व्रतबंध सोहळा संपन्न पुरोहित प्रतिष्ठानच्यावतीने मोफत संस्कार
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर पुरोहित प्रतिष्ठानच्यावतीने नुकताच मोफत व्रतबंध सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात 7 बटूंना मौंजी बंधनाचे उपनयन संस्कार विधीवत देण्यात आले. संगमनेरमधील विविध क्षेत्रातील मान्यवर बटूंना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर, प्रतिथयश उद्योजक गिरीश मालपाणी, विजय नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. पराग सराफ, माजी प्राचार्य सुधाकर क्षीरसागर, राजहंस ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नंदू बेल्हेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अशोक सराफ, डॉ. अजित कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. पुरोहित प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकीचे माजी नगराध्यक्षा तांबे यांनी कौतुक केले. कोरोनाच्या दणक्याने अनेक परिवार अजूनही अडचणीतून सावरू शकले नाहीत. त्यामुळे स्वतंत्ररित्या सोहळा करणे त्यांना शक्य नाही. अशावेळी पुरोहित संघाने अतिशय देखणा सोहळा आणि तोही विनामूल्य आयोजित करून व्रतबंध संस्कार घडवून आणले ही गोष्ट प्रशंसनीय आहे.
उद्योजक गिरिश मालपाणी म्हणाले, खरोखरच ब्राह्मण समाजाचे कौतुक केले पाहिजे. या समाजात वाखाणण्याजोगी गुणवत्ता, सचोटी, धार्मिकता आहे. आमच्या सभागृहामध्ये हा पवित्र सोहळा संपन्न झाला ही आमच्या दृष्टीने मोठी आनंदाची व पुण्याची गोष्ट आहे. संस्थेचे अध्यक्ष भाऊ जाखडी आमच्या सोबत विविध सामाजिक कार्यात आघाडीवर असतात. संस्कार ही भारतीय संस्कृतीची जगात ओळख आहे ही ओळख जपण्याचे महान कार्य पुरोहित संघ करत आहे. विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी पुरोहित संघाचे संस्कृती व संस्कार संवर्धनाचे कार्य ही देशासाठी अत्यंत उपयुक्त कामगिरी असल्याचे मत मांडले. नाशिकचे गौतमी गोदावरी पाठशाळेचे रवींद्र पैठणे यांनी वैदिक मंत्रघोषात बटूंना आशीर्वाद दिले. यावेळी माजी नगरसेवक किशोर कालडा, शिरीष मुळे, डॉ. आशुतोष माळी, संकेत मुळे आदी उपस्थित होते. पुरोहित संघाचे भाऊ जाखडी, संदीप वैद्य, अरुण कुलकर्णी, चेतन मुळे, उमेश जोशी, शशीकांत वैद्य, विशाल जाखडी, सागर काळे, प्रतीक जोशी, पवन काळे, अभय देशपांडे, रवी तिवारी, अजित देशपांडे, बापू दाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संदीप वैद्य यांनी केले. सूत्रसंचालन सदस्य सतीश देशपांडे यांनी केले. तर आभारप्रदर्शन अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी केले.