धामोरीत पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी बिबट्याशी झुंज शेतकरी गंभीर जखमी; परिसरात पसरले भीतीचे वातावरण

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यात बिबट्याची दिवसेंदिवस दहशत वाढली आहे. आतातर बिबटे चक्क माणसांवर हल्ले करत आहेत. धामोरी येथील गंगाधर वाळीबा ठाकरे (वय 70) यांनी आपल्या पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी थेट बिबट्याशी झुंज घेतली. त्यात शेतकरी गंभीर जखमी झाला.

या घटनेची माहिती अशी की, गुरुवारी (ता.2) पहाटे पावणेतीनला गंगाधर ठाकरे यांच्या खोकडमळा शिवारातील वस्तीवर गोठ्यातील गायी हंबरू लागल्या. सोबतच कुत्र्याचाही आवाज येत असल्याने ठाकरे घराबाहेर आले. बाहेर बिबट्याची त्यांच्या कुत्र्याशी हल्ला करुन झटापट सुरू होती. ठाकरे यांनी लोखंडी पाईप घेऊन कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी बिबट्याने कुत्र्याला सोडून ठाकरे यांच्यावर हल्ला केला. ठाकरे व बिबट्यात झुंज सुरू झाली.

बिबट्याने ठाकरे यांची मान पकडण्याच्या प्रयत्नात त्यांच्या डाव्या कानाचे, डाव्या हाताच्या काखेचे, कोपराचे लचके तोडले. तरीही ठाकरे यांची मान जबड्यात सापडत नसल्याने चवताळलेल्या बिबट्याने ठाकरे यांचे डोके जबड्यात धरून ओढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याचे सुळे ठाकरे यांच्या डोक्यात आरपार गेले. जखमी झालेल्या ठाकरे यांचा किंचाळण्याचा आवाज त्यांच्या पत्नी कुसुमबाई ठाकरे यांच्या कानी पडताच त्यांनी बॅटरी लावून आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यांच्या सोबत नातू ज्ञानेश्वर ठाकरे हेही होते. बॅटरीच्या प्रखर प्रकाशाने घाबरलेला बिबट्या तेथून पळून गेला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
