गीता परिवाराच्या ‘लर्न गीता’ उपक्रमाचा ‘वैश्विक’ बहुमान..! जगातील सर्वात मोठा ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग म्हणून ‘गोल्डन बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नोंद..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘जगातील सर्वात मोठा ऑनलाईन गीता प्रशिक्षण वर्ग’ म्हणून गीता परिवाराच्या ‘लर्न गीता’ या उपक्रमाचा गोल्डन बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये समावेश करण्यात आला आहे. गेल्या जूनमध्ये सुरु करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमात आत्तापर्यंत 59 देशातील 35 हजार पेक्षा अधिक गीतापाठींनी सहभाग घेतला आहे. एकट्या ऑक्टोबरमध्ये 40 देशातील 12 हजार 574 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला होता. याची दखल घेत गोल्डन बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड समितीने जगातील सर्वात मोठा ऑनलाईन गीता प्रशिक्षण वर्ग म्हणून या जागतिक उपक्रमाची नोंद घेतली आहे. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेतून गीता परिवाराच्या माध्यमातून साडेपाचशे कार्यकर्त्यांनी गेल्या पाच महिन्यांपासून घेतलेल्या परिश्रमांचे हे फळ असल्याची प्रतिक्रिया गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी दिली.

वैश्विक कल्याणाचे सूत्र सांगणार्‍या श्रीमद् भगवद्गीतेबाबत जगभरातील लोकांना विशेष आकर्षण आहे. मात्र गीता शिकण्याचे कोणतेही सहज साधन आजवर उपलब्ध नसल्याने त्यांना इच्छा असून गीतेचे ज्ञान प्राप्त करता येत नव्हते. कोविडमुळे जगभरात लॉकडाऊन सुरु झाल्याने या कालावधीत घरातच असलेल्या बहुतेकांना ऑनलाईन पद्धतीने या महान वैश्विक ग्रंथाचे प्रशिक्षण देता येईल या विचाराने गीता परिवाराने जूनमध्ये लर्नगीता डॉट कॉम नावाचे संकेत स्थळ निर्माण करुन त्याद्वारे गीता वाचन व पाठांतर करु इच्छिणार्‍यांसाठी हा अभिनव उपक्रम सुरु केला.

यासाठी गीता परिवाराच्या 275 प्रशिक्षक व तितक्याच तांत्रिक सहाय्यकांच्या मदतीने चार स्तरांचा हा उपक्रम सुरु करण्यात आला. गेल्या जूनपासून सप्टेंबरपर्यंत 23 हजारांहून अधिक जणांनी या उपक्रमात सहभाग घेवून आपले प्रशिक्षणही पूर्ण केले. ऑक्टोबरमध्ये 40 देशातील 12 हजार 574 जणांनी तर नोव्हेंबरमधील पाचव्या सत्रात 12 हजार 800 जणांनी सहभाग घेतला आहे. पहिल्या स्तरात गीतेतील बारावा व पंधरावा अध्याय वाचन, दुसर्‍या स्तरात बारावा, पंधरावा व सोळावा अध्याय मुखोद्गत, नववा, चौदावा व सतरावा अध्याय मुखोद्गत, तिसर्‍या स्तरावर पहिला, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा व सातवा अध्याय कंठस्थ व चौथ्या स्तरात दुसरा, आठवा, दहावा, अकरावा, तेरावा व अठरावा अध्याय कंठस्थ करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

या अभिनव उपक्रमातील पाचव्या सत्रात हिंदी, मराठी, इंग्रजी, तेलगु, तमीळ, मल्याळम्, कन्नड, बंगाली, उडिया आणि पंजाबी अशा दहा भाषांमधून प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात सहभाग घेणार्‍या साधकांना अनुपठणाच्या निर्देशासह वरील दहा भाषांमध्ये लिखित स्वरुपात श्लोक पाठविले जातात. त्यानुसारच ध्वनीमुद्रित आणि लिखित श्लोकांसह अनुपठणाचा व्हिडीओ साधकांना दिला जातो. झूम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एक प्रशिक्षक सत्तर साधकांना गीता पठणाचे प्रशिक्षण देतात. याचवेळी तांत्रिक सहाय्यक आपल्या मोबाईल सोबतच संगणकाच्या पडद्यावर लिखित श्लोकही दाखवले जातात. सर्व साधकांचा समाज माध्यमात समूह देखील करण्यात आला असून त्याद्वारेही त्यांना प्रशिक्षणासंबंधी मार्गदर्शन व सूचना दिल्या जातात.

प्रत्येक आठवड्याच्या शनिवार व रविवारी प्रत्येक स्तरावरील साधकांसाठी वेगवेगळ्या वेळी त्या-त्या गीता अध्यायाचे अर्थ विवेचन करण्याचे एकत्रित सत्र घेतले जाते. महिन्यात तीन वेळा गीता कंठस्थीकरण परीक्षा घेतल्या जातात. ज्यांना केवळ गीता पठण शिकायचे आहे, त्यांना कोणत्याही परीक्षेशिवाय पुढील स्तरावर प्रवेश घेता येतो. परीक्षेनंतर गीता गुंजन प्रशस्तीपत्रक ऑनलाईन पद्धतीने तथा जिज्ञासू, पाठक, पथिक इत्यादी प्रशस्ती पत्रक पोस्टाने पाठविले जातात. गीता परिवाराचे उपाध्यक्ष डॉ.आशू गोयल हे या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख आहेत. सुवर्णा मालपाणी प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळत आहेत.

जगात ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर त्याचा वापर करीत इतक्या मोठ्या प्रमाणात गीतेचे प्रशिक्षण देण्याचा हा पहिलाच प्रयोग ठरल्याने गोल्डन बुक्स ऑफ वर्ल्ड रकॉर्डने वैश्विक पातळीवरील ‘सर्वात मोठा ऑनलाईन गीता प्रशिक्षण वर्ग’ म्हणून त्याची नोंद घेत या उपक्रमाचा वैश्विक बहुमान केला आहे.

Visits: 3 Today: 1 Total: 27355

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *