पर्यावरण संवर्धन पुरस्काराने राज्यातील 14 संस्थांचा सन्मान संगमनेरच्या दंडकारण्य अभियानाचाही झाला पुणे येथे गौरव
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सजीवसृष्टीच्या रक्षणासाठी थोर स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी वयाच्या 84 व्या वर्षी सुरु केलेले दंडकारण्य अभियान ही पर्यावरणाची मोठी लोकचळवळ ठरली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्काराने पुणे येथे 14 संस्थांना गौरविण्यात आले असून दंडकारण्य अभियानाला हा पुरस्कार मिळाला आहे.
पुणे येथील आकाशवाणी सभागृहात हरित मित्रपरिवार, गुरुकृपा संस्था, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात पर्यावरण संवर्धन पुरस्कार वितरण संपन्न झाले. यावेळी हरित मित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. महेंद्र घागरे, प्रशांत थोरात, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, आकाशवाणीचे गडवाल, आकाशवाणीचे उपसंचालक इंद्रजीत बागुल व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर आदी उपस्थित होते.
दंडकारण्य अभियानाचे प्रणेते स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी पर्यावरण संवर्धनाकरीता वयाच्या 84 व्या वर्षी दंडकारण्य अभियान ही लोकचळवळ सुरू केली. या अभियानातून संगमनेर तालुक्यात उघड्या बोडक्या डोंगरांवर 35 कोटी बियांचे रोपण झाले असून आज हा तालुका वनराईने फुलला आहे. आयुष्यभर समाजसेवा, सहकार आणि पर्यावरणासाठी काम करणार्या स्वातंत्र्यसैनिक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नावाने हरित मित्र पुणे या संस्थेने राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केले आहेत. पर्यावरण आणि संवर्धन क्षेत्रात काम करणार्या विविध 14 संस्थांना यावेळी सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
संगमनेरमधून दंडकारण्य अभियानाला हा पुरस्कार मिळाला असून प्रचार-प्रसार कार्याबद्दल आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांना तर उत्कृष्ट समन्वयाबद्दल बाळासाहेब उंबरकर यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, दुर्गा तांबे, बाजीराव खेमनर, अॅड. माधव कानवडे, इंद्रजीत थोरात, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, बाबा ओहोळ, रणजीतसिंह देशमुख, सुधाकर जोशी, संपत डोंगरे, शंकर खेमनर, लक्ष्मण कुटे आदिंसह विविध पदाधिकार्यांनी अभिनंदन केले आहे.