मराठा-ओबीसी नेत्यांच्या वादाची मला वेदना होते ः छत्रपती संभाजीराजे संगमनेरात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या साखळी उपोषणास भेट

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्या मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये जो वाद चालू आहे याचा छत्रपतींचा एक वंशज म्हणून मला मनापासून वेदना होत असल्याची खंत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली.

संगमनेर बसस्थानकाजवळ ४७ दिवसांपासून सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला भेट देण्यासाठी आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील खंत व्यक्त केली. त्यांचे आगमन झाल्यानंतर स्वराज्य पक्षाच्यावतीने त्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि उपोषणास भेट दिली. यावेळी एक मराठा लाख मराठा मराठा, समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. त्यांच्या समवेत स्वराज्याचे राज्य सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, जिल्हाप्रमुख आशिष कानवडे होते.

यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, मराठा समाज आणि ओबीसी समाज हे दोघे एकमेकांचे भावंडं आहेत. एकाच छताखाली आणि एका गावात राहणारे लोक आहेत. त्या दोन्ही समाजाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. त्यामुळे या दोन्ही समाजामध्ये एकमेकांविरुद्ध दुही निर्माण होत आहे. तसेच सामान्य मराठा आणि सामान्य ओबीसी यांच्यात बाधा येऊ नये अशी वक्तव्ये आणि शब्दरचना दोन्ही समाजाच्या नेत्यांनी करु नये असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच इंदापूरमध्ये धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने चप्पल फेकून मारली हे जे काही सध्या चालले आहे ते महाराष्ट्राच्या दृष्टीने अशोभनीय असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
