आढळा परिसरात कोविड सेंटर सुरू करा ः जाधव

नायक वृत्तसेवा, अकोले
कोरोनाच्या दुसर्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. यामुळे तालुक्यात रोज बाधितांच्या संख्येत विक्रमी भर पडत आहे. तालुक्याच्या आढळा खोर्यातही कोविडचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत असून, उपाययोजनांअभावी बाधितांना उपचार मिळणे मुश्किल होत आहे. त्यामुळे या परिसरात तत्काळ कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कैलास जाधव यांनी केली आहे.

आढळा खोर्यातील समशेरपूर, घोडसरवाडी, नागवाडी, टाहाकारी, केळी-रुम्हणवाडी, कोंभाळणे, खिरविरे, तिरडे या गावांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड आहे. समशेरपूर आरोग्य केंद्रामध्ये बेडची व्यवस्था कमी असल्याने बाधितांना योग्य उपचार मिळत नाहीत. त्यातच बाधितांची संख्या वाढल्याने स्थानिक प्रशासनाला काम करणे अवघड झाले आहे. त्यातच नागरिकांच्या बेफिकीरीमुळे संक्रमण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात कोविड सेंटरची नितांत गरज असून, आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी तत्काळ सुरू करावे. अन्यथा आढळा विभागाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.
